बीड, दि. 12 (लोकाशा न्यूज) : बीड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बाबू जोगदंड यांच्या भगिणी सरला मुळे यांची तर उपसभापती पदी श्यामराव पडूळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापती पद आ. संदिप क्षीरसागर यांच्याकडे तर उपसभापती पद उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्याकडे गेले आहे.
बीड बाजार समितीच्या निवडणूकीत आ. जयदत्त क्षीरसागर यांना रोखण्यासाठी आ. संदिप क्षीरसागर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, अनिल जगताप, कुंडलिक खांडे, ज्योतीताई मेटे या सर्वांनी एकत्र येवून निवडणूक लढविली होती, यामुळे या निवडणूकीत जयदत्त अण्णांच्या पॅनलचा धुव्वा उडाला. याठिकाणी जयदत्त अण्णांच्या फक्त तीन जागा निवडूण आल्या, 15 जागांवर आ. संदिप क्षीरसागरांनी विजय मिळविला, त्यानुसार आज बीड बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यानुसार सभापती पदाची माळ डॉ. बाबू जोगदंड यांच्या भगिणी सरला मुळे तर उपसभापतीची माळ श्यामराव पडूळे यांच्या गळ्यात पडली आहे. या निवडीनंतर आनंद साजरा केला जात आहे. दरम्यान बीड बाजार समितीचे सभापती पद सरला जोगदंड यांना मिळाल्यामुळे बालाघाटाचे मार्केट वाढले आहे.