बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : महापुरूषांची जयंती साजरी करताना अनेक जण सामाजिक भान विसरून जातात, अशा वेळी वाजविल्या जाणार्या डीजेंच्या आवाजाची मर्यादाही प्रचंड प्रमाणात ओलांडली जाते, तसाच प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी बीडसह जिल्ह्यात पहायला मिळाला. परिणामी परवानगी न घेता आणि आवाजाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी डीजे मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मोहिम पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी हाती घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार शनिवारी माजलगावमध्ये पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी 11 जणांवर गुन्हे दाखल केले, त्याचप्रमाणे केजमध्ये सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर रविवारी बीडमधील डीजे मालकांनाही एसपींनी मोठा दणका दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार बीडमध्ये 26 डीजे मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डीजेच्या दणदणाटामुळे अनेकांना त्रास होतो, यामध्ये एखाद्याचा जीव जाण्याचीही शक्यता असते, त्यामुळे डीजे वाजणार नाहीत, याची काळजी जिल्हा पोलिस दलाकडून घेतली जाते, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर हे तर डीजेच्या पुर्णपणे विरोधात आहेत, असे असतानाही 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीला अनेकांनी नियमांना न जुमानता थेट डीजेचा दणदणाट सुरू ठेवला. परिणामी नाईलाजाने पोलिस अधीक्षकांना नियम तोडणार्यांवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. शनिवारी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात सुनिल विक्रम आलझेंडे (रा. पंचशील नगर), गणेश सुर्यकांत निपटे (रा.पिंपरखेड ता.वडवणी), रोहित प्रकाश सोनवणे (वाहन क्र. एमएच 16 एई 7020 रा. श्रीरामपुर जि.नगर), किशोर भाऊसाहेब लाड (रा.जालना वाहन क्र. एमएच 48 जी. 727), अशोक भास्कर खरमाटे (रा.तिंतरवणी भगवानगड ता.शिरूर वाहन क्र.एमएच 04 एस 2825), शंकर रणदिवे (रा. माऊलीफाटा तालखेड ता. माजलगाव), जयेंद्र गोरे (रा.बीड वाहन क्र. एमएच 23 5969), ज्ञानेश्वर जोगदंड (रा.कळंब जि.उस्मानाबाद), ज्ञानेश्वर विघ्ने (रा. ब्रम्हगाव ता.माजलगाव), बाळासाहेब जाधव (रा.बीड वाहन क्र.एमएच 10 झेड 2437) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच याच दिवशी केजमध्ये सुमेध गुलाबराव शिंदे, शंकर सुरेश किनगी, कुमार अंबादास संगेपागोळे, प्रविण बंडू मस्के, बिरू बाळू चौगुले आणि युवराज कैलास भालेराव यांच्यावर कलम 188, 268, 283 भादविनुसार 15,19 ध्वनी प्रदुषण अधिनियम 2000 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तर आता पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीडमध्येही डीजेवाल्यांना मोठा दणका दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार रविवारी बीडमध्ये 26 डीजे मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. यामुळे डीजेवाल्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.