Uncategorized

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचा होणार केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश, खा.प्रितमताई मुंडे यांच्या मागणीला पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांचा सकारात्मक प्रतिसाद

परळी । दि. ०५ ।
केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांची दिल्ली इथे खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी नुकतीच भेट घेतली. याभेटीत त्यांनी वैद्यनाथ मंदिराचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याची मागणी सादर केली. केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांचा सकारात्मक दृष्टिकोन पाहता लवकरच तीर्थक्षेत्र वैद्यनाथ मंदिर विकासाचे परळीकरांचे स्वप्न पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांनी पूर्ण करण्यास यश मिळेल हा विश्वास दुणावला असल्याची भावना खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली.

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जवाबदारी सांभाळत असताना माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी एकशे तेहतीस कोटी रुपयांचा वैद्यनाथ मंदिर विकास आराखडा मंजूर केला होता. यापैकी वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. राज्य सरकारच्या माध्यमातून वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचा विकास करत असताना केंद्र सरकारच्या ‘प्रसाद योजनेत’ वैद्यनाथ मंदिराचा समावेश व्हावा याकरिता पंकजाताई आणि खा.प्रितमताई मुंडे प्रयत्नशील होत्या, या अनुषंगाने त्यांनी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची नुकतीच भेट घेऊन ही मागणी सादर केली होती. त्यांच्या मागणीला मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारकडून तातडीने वैद्यनाथ मंदिर सुधारित विकास आराखडा मागवून घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.

केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांनी दिलेल्या सूचना आणि सकारात्मक प्रतिसाद बघता लवकरच वैद्यनाथ मंदिराचा केंद्र सरकारच्या ‘प्रसाद योजनेत’ समावेश होईल आणि तीर्थक्षेत्र विकासाचे परळीकरांचे स्वप्न पूर्ण होईल. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.प्रितमताई मुंडे यांचा पाठपुरावा मंदिराच्या विकास आराखड्याला मूर्त स्वरूप मिळवून देणारा ठरेल असा विश्वास परळीकरांकडून व्यक्त केला जातो आहे.

••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!