Uncategorized

बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा भाजपचा बालेकिल्ला बनविणार, पंकजाताईंचा निर्धार, कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भाजप जिल्हा कार्यकारिणी बैठकीला आले सभेचे स्वरूप, राष्ट्रप्रेमाला कणा मानून भारतीय जनता पक्षाने राजकारणाची गुंफण केली, आगामी सर्व निवडणुकांमध्ये शतप्रतिशत विजय मिळवण्याचा निर्धार



अंबाजोगाई, दि. 19 (लोकाशा न्यूज) : देशप्रेम, राष्ट्रप्रेमाला कणा मानून भारतीय जनता पक्षाने त्याभोवती राजकारणाची गुंफण केली. एकात्मता, मानवतावाद हे भारतीय जनता पक्षाचे ऑक्सिजन आहे, असे प्रतिपादन पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केले. अंबाजोगाई येथे संपन्न झालेल्या भाजपच्या बीड जिल्हा कार्यकारिणी बैठक आणि बूथ सशक्तीकरण प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. जिल्हाभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे या बैठकीला अक्षरशः मोठ्या सभेचे स्वरूप आले होते. दरम्यान पुन्हा एकदा बीड जिल्हाला भाजपचा बालेकिल्ला बनविणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रविवारी (दि.19) अंबाजोगाई येथील साधना मंगल कार्यालयात भाजपचा बूथ सशक्तीकरण प्रशिक्षण वर्ग आणि जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या की, कार्यकर्त्यांच्या विचाराने पक्ष चालावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोचण्यासाठी यंत्रणा राबविली आहे. त्यासाठीच सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हि त्रिसूत्री त्यांनी दिली आहे. सर्वप्रथम राष्ट्राला सन्मान द्या, त्यानंतर संघटनेवर प्रेम करा. पक्षाची शक्ती कार्यकर्त्यात आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ही बैठक आहे. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी पक्षवाढीसाठी अपार योगदान दिले. त्यामुळे गावखेड्यात पक्षाचे धोरण पोहोंचले, कार्यकर्ता जोडला गेला. याचा फायदा आजही पक्षाला होत आहे. लाखो कार्यकर्त्यांच्या जीवावर, त्यांचे प्रेम आणि परिश्रमामुळे मुठभर नेते राज्य करू शकतात. त्यामुळे पक्षवाढीत काही कमतरता आढळल्यास कार्यकर्त्यांना दोष न देता त्यांच्या उदासीनतेबाबत विचार व्हायला हवा. कार्यकर्त्यांना असणारे वळण, पदाधिकार्‍यांना असणारी शिस्त आणि नेत्यांची कार्यकर्त्यांवर असणारी भिस्त हे राजकारणाचे समीकरण आहे. कार्यकर्त्यांनी स्वाभिमान गहाण ठेऊ नये, आपल्या संघर्षाला सोन्याचे दिवस नक्की येतील असे प्रोत्साहन पंकजाताईंनी कार्यकर्त्यांना दिले. बीड जिल्ह्यात पक्ष चालवणे सोपे नाही, राजकारणात अत्यंत अग्रेसर असणारा हा जिल्हा आहे. जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यात काही बाबतीत मतभेद असतील, पण मनभेद नाहीत. आम्ही सर्व एकदिलाने काम करून आगामी सर्व निवडणुकात शतप्रतिशत विजय मिळवण्याचा आणि बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा भाजपचा बालेकिल्ला बनविण्याचा निर्धार पंकजाताईंनी बोलून दाखवला. याप्रसंगी आ. सुरेश धस, माजी आ.आर.टी देशमुख, भीमराव धोंडे, रमेश आडसकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, पक्षाचे प्रवक्ते राम कुलकर्णी, सर्जेराव तांदळे यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आ. नमिता मुंदडा यांनी व्हिडीओ कॉलद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय मुंदडा यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. देविदास नागरगोजे यांनी केले. या बैठकीला हजारोच्या संख्येने कार्यकते उपस्थित होते.

प्रेमाला रंग नसतो
आजकाल अभिनेत्रींनी परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगावरून देश पेटत आहे. लोक रंगात धर्म शोधत आहेत. पण भाजपच्या झेंड्यात भगवा आणि हिरवा रंग एकजीव झालेले आहेत. धर्माचे राजकारण मुंडे साहेबांना मान्य नव्हते. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला तरुण हा मुस्लीम होता. प्रेमाला नातं नसतं, रंग नसतो असे पंकजाताई म्हणाल्या.

आ. नमिता मुंदडा यांच्या
नियोजानाचे कौतुक

केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी या बैठकीचे नियोजन केले होते. त्यांनी केलेल्या चोख नियोजनाचे उपस्थित सर्व नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कौतुक केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!