परळी वैजनाथ ।दिनांक ११।
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची १२ डिसेंबरला जयंती आहे, यादिवशी गोपीनाथ गडावर येण्याऐवजी सर्वांनी आपापल्या परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून गोपीनाथ गड गांवागांवात पोहोचवावा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. राज्यात घडलेल्या अप्रिय घटनांबद्दल त्या उद्या अर्ध्या तासाचं मौन बाळगणार असून कार्यकर्त्यांनाही त्यांनी मौन बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त उद्या १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. पासून गोपीनाथ गडावर हरिनाम भजन व समाधी दर्शनास प्रारंभ होणार आहे. सकाळी ११ वा. पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे गोपीनाथ गडावर समाधीचे दर्शन घेणार आहेत. दर्शनानंतर सकाळी ११.३० ते दुपारी १२ वा दरम्यान राज्यात घडलेल्या अप्रिय घटनांना प्रातिनिधिक स्वरूपात तिलांजली देण्यासाठी त्या अर्धा तास मौन बाळगणार आहेत. तदनंतर त्या समाधी स्थळावरून ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. सोशल मिडियाच्या म्हणजेच फेसबुक लाईव्ह, झुम लिंकच्या माध्यमातून पंकजाताई राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मुंडे साहेबांना अभिप्रेत असणारे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून गरजूंची सेवा करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
••••