बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : पहिल्या टप्प्यात राज्यातील 55 हजार सरकारी अंगणवाडी केंद्र जवळच्या प्राथमिक शाळेशी जोडण्यात येणार आहेत. राज्यात सुमारे 1 लाख अंगणवाड्यांमधून पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात येत असून उर्वरित 45 हजार अंगणवाडया टप्प्याटप्प्याने प्राथमिक शाळांमध्ये विलीन होणार आहेत.
पहिल्या टप्प्यात विलीन होणार्या 55 हजारांपैकी 40 हजार अंगणवाडया प्राथमिक शाळांच्या आवारात चालतात. उर्वरित 15 हजार अंगणवाडयांना नजीकच्या प्राथमिक शाळेत जागा दिली जाईल. महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने शालेय शिक्षण विभाग हा उपक्रम राबवीत असल्याची माहिती समग्र शिक्षा, राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) सध्या पूर्व प्राथमिकसाठी अभ्यासक्रम तयार करीत आहे. या अंगणवाडयांमधील मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. अंगणवाडी शिक्षिकांना या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाला प्राथमिक शिक्षणाशी जोडणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा भाग असून त्यानुसार हा उपक्रम राबविला जात आहे. अंगणवाडीमध्ये शिकणारी मुले जेव्हा प्राथमिक शाळेत जातात त्या वेळी बरीच मुले घाबरलेली असतात. नवीन शाळेत जुळवून घेण्यासाठी त्यांना दोन-तीन महिन्यांचा अवधी लागतो. अंगणवाडयांच्या विलीनीकरणामुळे या मुलांना एकाच शाळेत जाण्याची सवय होईल आणि त्यांना कोणताही फरक जाणवणार नाही किंवा नवीन वातावरणाचा अनुभव येणार नाही. त्यासाठी हा उपक्रम पुढील वर्षापासून अमलात आणला जाणार आहे.