बीड (प्रतिनिधी):- जिल्हाभराचे लक्ष्य लागून असलेला गजानन सहकारी कारखाना अखेर सुरू झाला आहे. या हंगामात ऊस गाळपाला सुरूवात होणार असा शब्द आ.संदीप क्षीरसागर यांनी दिला होता. आता शब्दपूर्ती करत गजानन कारखान्याची चिमणी रविवार (दि.13) रोजी पेटलीच. आणि गजानन कारखाना अखेर सुरू झालाच. शेतकर्यांच्या आणि कर्मचर्यांच्या चेहर्यावरील समाधान पाहून नितांत आनंद होत असल्याची प्रतिक्रिया आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी दिली.
गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेला गजानन सहकारी कारखाना सुरू करण्यासाठी आ.संदीप क्षीरसागरांचे, सातत्याने पाठपुराव्यातून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अखेर यश आले. बीड विधानसभा मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणार्या गजानन साखर कारखाना चालू झाल्याने बीड विधानसभा मतदारसंघासह जिल्हाभरातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी प्रकर्षाने जिल्ह्यासमोर अतिरिक्त उसाचे संकट उभे राहत असते. या संकटातून सुटका होण्यासाठी आता गजाननरूपी आधार मिळाला आहे. यामुळे प्रयत्नांना पूर्ण यश प्राप्त झाले असून शेतकऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या आनंदातून समाधान अनुभवत असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
चौकट
काकूंचा वारसा अखंड ठेवण्यासाठी सदैव तत्पर-आ.संदीप क्षीरसागर
स्व.केशरकाकूंचा वारसा अखंड ठेवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. आशिया खंडातील पहील्या महीला साखर कारखाना चेअरमन असलेल्या काकूंनी गजानन साखर कारखान्याची उभारणी केली होती. गजानन साखर कारखाना साधारणतः 10 वर्षांपूर्वी बंद पडला होता, तेव्हापासूनच माझ्या आई स्व.रेखाताई क्षीरसागर आणि वडील रवींद्र दादा क्षीरसागर व विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांची व नागरिकांची गजानन सुरू व्हावा अशी मोठी इच्छा होती. ती आज पूर्ण झाली याचा मोठा आनंद आहे परंतू आई आज हा सुवर्णक्षण पाहण्यास नाहीत याची मोठी खंत असल्याचेही आ.क्षीरसागर म्हणाले.