परळी वैजनाथ ।दिनांक २१।
गुरूवारी मध्यरात्री तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज सकाळीच कौठळी, तळेगाव शिवारातील शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा अशा सूचना त्यांनी महसूल प्रशासनाला दिल्या.
काल रात्री तालुक्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, काही गावात ढगफुटीसदृश पाऊस झाला. शेतात चहुकडे पाणीच पाणी झाल्याने उभी पिके जमीनदोस्त झाली. पिकासोबत शेतातील मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ऐन दिवाळीत झालेल्या या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पंकजाताई मुंडे यांनी आज तळेगाव, कौठळी शिवारातील शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मदतीचा शब्द दिला. यावेळी तहसीलदार शेजूळ उपस्थित होते, त्यांना नुकसानीचा अहवाल तातडीने शासनाला पाठविण्याची सूचना केली.
गाढे पिंपळगावच्या बेपत्ता युवकाचा शोध घेण्याची सूचना
पुराच्या पाण्यात गाढे पिंपळगाव येथील एक युवक बेपत्ता झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पंकजाताईंनी प्रशासनाला सूचना केल्या. सरपंच सोनवणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांनी या युवकाच्या कुटुंबाला धीर दिला. सदर बेपत्ता युवकाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.