बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी लढण्याचे काम स्व.आण्णासाहेब पाटील यांनी केले, पुढे उपमुख्यमंत्री असताना लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी याच लढवय्या आण्णासाहेब पाटील यांच्या नावाने महामंडळ सुरू केले. या महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा एखदा नरेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घोषणा केली आहे. पाटील यांच्या झालेल्या या नियुक्तीमुळे मराठा समाजाला न्यायच मिळणार आहे.
मराठा समाजातील तरूणांना उद्योगात संधी मिळावी, याकरिता स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी उपमुख्यमंत्री असताना आपल्या युती सरकारच्या काळात आण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली. यावेळी महामंडळाला पुरेशा निधीही मुंडेंनी उपलब्ध करून दिला, मात्र सरकार गेल्यानंतर हे महामंडळ पुन्हा अडगळीला पडले, पुढे 2014 मध्ये युतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महामंडळाला न्याय देण्याची भुमिका घेवून निधीचा पाऊस पाडला, विशेष म्हणजे मराठा समाजाला न्याय मिळावा याकरिता या मंडळाची अध्यक्षपदाची जबाबदारी फडणवीसांनी आण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांच्यावर सोपविली. अध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर येताच नरेंद्र पाटलांनी बीडसह संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या या कामामुळे बीडसह महाराष्ट्रातील अनेक मराठा समाजाच्या तरूणांना उद्योगात भरारी घेण्यास मोठी संधी मिळाली, मात्र 2019 मध्ये पुन्हा सरकार बदलले आणि हे महामंडळ पुन्हा अडगळीला पडले, आता पुन्हा राज्यात भाजप-शिंदे सेनेचे सरकार आले आहे. त्यामुळे पुन्हा या महामंडळाला ताकत देण्याचे काम या सरकारने हाती घेतले आहे, त्याअनुषंगानेच या महामंडळावर पुन्हा एखदा अध्यक्ष म्हणून नरेंद्र पाटील यांची घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रविवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात केली आहे. त्यामुळे बीडसह महाराष्ट्रातील मराठा समाजाला खर्या अर्थाने न्याय मिळणार आहे.