Uncategorized

ऊसतोड कामगार, मुकादमांचे प्रश्न सोडविण्यासाठी पंकजाताई मुंडे आग्रही, मुख्यमंत्र्यांना भेटून विषय मार्गी लावण्याचा बैठकीत दिला शब्द,ऊसतोड कामगार माझ्यासाठी जीव की प्राण ; त्यांचेसाठीच माझी लढाई

बीड ।दिनांक २४।
राज्यातील ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज आग्रही भूमिका मांडली. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच आपण मुख्यमंत्र्यांना भेटून विषय मार्गी लावू असा शब्द त्यांनी कामगार, मुकादमांना दिला.

ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार संघटनांची बैठक आज मांजरसुंबा (ता. बीड) येथे झाली, त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदारांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी यावेळी चर्चा केली.

पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, ऊसतोड मजूर हा माझ्यासाठी जीव की प्राण आहे, त्यांचेसाठीची माझी लढाई कुठलेही श्रेय घेण्यासाठी नाही तर त्यांच्या योग्य न्यायासाठी आहे. लोकनेते मुंडे साहेबांच्या नावानं ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ व्हावं ही माझी पहिल्यापासून इच्छा होती. ते झालं पण त्याचा दोन वेळा विभाग बदलला, मंत्री बदलले, विलंब झाला, न्याय देता आला नाही याची खंत आहे. दरवाढी बरोबरच कामगारांना विमा, बैलांना विमा व मुलांचं शिक्षण, वस्तीगृह असे प्रश्न आहेत. यापुढे महामंडळाच्या माध्यमातून ते सोडवू. कामगार, मुकादमांना संरक्षण हे देखील आमच्यासाठी तेवढचं महत्वाचं आहे

कामगारांचे मुलं सतत ऊसच तोडणार का ?..ही स्थिती बदलली पाहिजे यासाठी मी सातत्याने काम करत आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटणार
——‘
महामंडळाचा तसेच कामगारांचा विषय मार्गी लागावा यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. पुढच्या हंगाणापर्यत सर्व विषय मार्गी लागले पाहिजेत असे प्रयत्न राहतील. मी तुमच्याबरोबर तिथं येईल, कायमस्वरूपी तोडगा द्या अशी मागणी करू. संघटना ही आपली ताकद आहे, यात कुणी अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो प्रयत्न हाणून पाडा असं पंकजाताई म्हणाल्या.
यावेळी संघटनेच्या वतीने पंकजाताईंना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गोपीनाथराव मुंडे साहेब ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष श्रीमंतराव जायभाये, संजय तिडके, गोरक्षदादा रसाळ, सुरेश वनवे, रामहरी दराडे, कृष्णा तिडके यांच्यासह असंख्य कामगार, मुकादम यावेळी उपस्थित होते.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!