दिंद्रुड ( लोकाशा न्युज ) माजलगाव मतदार संघाचे माजी मंत्री तथा आमदार प्रकाश दादा सोळंके यांचे दिंद्रुड येथील कट्टर खंदे समर्थक माजी उपसरपंच युवराज ठोंबरे यांच्यासह दहा जणांवर भाजपाचे माजी पंचायत समिती सदस्य यांचा मुलगा वैभव देशमाने यांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात काल गुरुवारी रात्री ॲट्रॉसिटी व दखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, मागील वर्षी 21जुलै रोजी दिंद्रुड येथील ग्रामपंचायत मध्ये मासिक सभेमध्ये विकास कामावरून दोन गटांमध्ये राडा झाला होता. यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघांचेही परस्पर गुन्हे दाखल न करून घेता दोन्ही गटाचे मिळून 22 जणांवर पोलिसांनी दखलपात्र गुन्हे दाखल केले होते. यानंतर यामधील भाजपाचे माजी पंचायत समिती सद्स्य मधुकर देशमाने यांचा मुलगा फिर्यादी वैभव देशमाने यास भांडणात मार लागल्याने दिंद्रुड पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्याने माजलगाव विशेष न्यायालयात दाद मागून न्यायालयाच्या आदेशानुसार तब्बल एक वर्षा नंतर आमदार प्रकाश सोळंके यांचे खंद्दे समर्थक माजी उपसरपंच युवराज ठोंबरे यांच्या सह मुंजा उर्फ मुन्ना ठोंबरे , नागेश ठोंबरे, योगेश ठोंबरे, महेश संदिपान ठोंबरे यांच्या सह इतर सहा जणांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम कायद्यान्वये दखलपात्र गुन्हा गुरुवारी रात्री दिंद्रुड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड हे करीत आहेत