Uncategorized

कॉफी शॉप’च्या नावाखाली  अंबाजोगाईत अश्लीलतेचे अड्डे, एएसपी कविता नेरकरांनी मारली धाड


अंबाजोगाई, दि. 13 (लोकाशा न्यूज) अंबाजोगाई शहरात कॉफी शॉपच्या नावाखाली तरुणाईला अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना मिळाली होती. त्यानंतर नेरकर यांनी मंगळवारी (दि.13) सायंकाळी स्वतः तपासणी करत दोन कॉफी शॉपवर धडक कारवाई केली.
अंबाजोगाई शहर शैक्षणिक केंद्र असल्यामुळे आजबाजूच्या गावातून शिक्षणासाठी येणार्‍या मुला-मुलींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शहरात विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेऊन अनेक व्यवसाय उभे राहिले. त्यात मागील काही काळात शहरात कॉफी शॉपचे पेव फुटले. अनेक होतकरू तरुणांना यामुळे व्यवसायाची, रोजगाराची संधी उपलब्ध झाली. मात्र, काही कॉफी शॉप चालकांच्या लालसेने या व्यवसायात अनैतिकतेचा प्रवेश झाला. अशा व्यावसायिकांनी शाळा व महाविद्यालयांच्या रस्त्यांवर कॉफी शॉप’ अशी गोंडस नावे देऊन आतील भागात खासगी कक्षां’ची निर्मिती केली आहे. येथे मिळणार्‍या कॉफीचे दर म्हणजे किती वेळेसाठी तो’ खासगी कक्ष आपणास पाहिजे त्यावर अवलंबून असतात. उपलब्ध सुविधांनुसार एका तासासाठी जवळपास दोनशे ते चारशे रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. अशा ठिकाणी बहुतेक शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थीनीच आढळतात, त्यातही अल्पवयीन विद्यार्थीनींचा समावेश अधिक असतो. अंबाजोगाई सारख्या सुसंस्कृत शहराच्या अशा कॉफी शॉपच्या माध्यमातून होणार्‍या र्‍हासाबद्दल सातत्याने ओरड होऊ लागली होती.
अपर अधीक्षक नेरकर यांनी केली स्पॉट पाहणी
दरम्यान, मागील महिन्यात गेवराई तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बीड शहरातील एका कॉफी शॉपमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कॉफी शॉप मधून चालणार्‍या अश्लीलतेचा मुद्दा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर अश्लीलतेचा अड्डा बनलेल्या काही कॉफी शॉपची माहिती अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना मिळाली होती. याचे गांभीर्य लक्षात घेत नेरकर यांनी मंगळवारी सायंकाळी स्वतः परळी रोडवर दीनदयाळ बँकेसमोरील टॉम अँड जेरी’ आणि यशवंतराव चव्हाण चौकातील कॅफे परफेक्ट’ या दोन कॉफी शॉपची स्पॉट तपासणी केली. या दोन्ही कॉफी शॉपमध्ये आतल्या बाजूस गुप्त केबिन केल्या होत्या. या ठिकाणी अल्पवयीन जोडपेही आढळून आले. याप्रकरणी श्रीकांत श्रीराम मुंडे, किरण विठ्ठल खाडे, ऋतुराज अरुण धायगुडे, श्रीकांत गोपाळ धायगुडे, सोमनाथ बाळासाहेब पारवे या पाच जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली.
कॉफी शॉप चालकांची बैठक बोलावणार
अंबाजोगाई सारख्या सुसंस्कृत शहराचे वातावरण बिघडू नये यांची सर्वतोपरी काळजी घेण्यात येईल पालकांनीही आपला पाल्य कुठे जातो, काय करतो याकडे लक्ष ठेवावे. लवकरच शहरातील कॉफी शॉप चालकांची बैठक बोलावून त्यांना योग्य त्या सूचना करण्यात येतील.
– कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!