मुंबई, दि. 27 (लोकाशा न्यूज) : राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार हे संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला (सक्तवसुली संचालनालय) प्राप्त झाली असून या संदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात लवकरच प्राथमिक चौकशी होणार असून त्यात जर काही तथ्य आढळले तर या चौकशीचे धागे रोहित पवार यांच्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ग्रीन एकर रिसॉर्ट अँड रिटेलर्स प्रा.लि. या कंपनीमध्ये रोहित पवार हे सन 2006 ते 2012 पर्यंत संचालक होते. त्यांचे वडिल राजेन्द्र पवार हे देखील या कंपनीमध्ये सन 2006 ते 2009 या कालावधीमध्ये संचालक होते. तसेच, या कंपनीशी येस बँक-डिएचएफएल घोटाळा प्रकरणी सध्या अटकेत असलेले राकेश वाधवान व सारंग वाधवान यांचा देखील अत्यंत जवळून संबंध असल्याचे समजते. मात्र, वाधवान बंधूंचे नाव येस बँक-डिएचएफएल घोटाळ्यात पुढे आल्यानंतर रोहित पवार यांनी या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे समजते. या कंपनीत आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली असून या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत.