बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना यांनी मंगळवारी सकाळी पेठ बीड पोलिस ठाण्याला सरप्राईज व्हिजीट दिली. यावेळी त्यांनी ठाण्यातील कामकाजाचा आढावा घेत पोलिस अधीकारी आणि कर्मचार्यांशी संवाद साधला, त्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात येवून पोलिस अधीकार्यांची बैठक घेतली, गुन्हेगारीला आळा घाला, त्यासाठी ज्या काही उपाय योजना कराव्यात लागतील त्या करा आणि बीड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात उंचवा, अशा स्पष्ट सुचना या बैठकीत आयजींनी दिल्या आहेत.
औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना मंगळवारी सकाळी बीडमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पेठ बीड पोलिस ठाण्याला सरप्राईज व्हिजीट दिली. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, डीवायएसपी संतोष वाळके, पेठ बीड ठाण्याचे पोलिस निरीक्षक केदार पालवे, एपीआय बनकर उपस्थित होते. यावेळी आयजी प्रसन्ना यांनी पेठ बीड ठाण्यातील दाखल गुन्हे, तपास आणि अन्य मुद्यांचा आढावा घेतला. ठाण्यातील अधिकारी, कर्मचार्यांशी संवाद साधला. या व्हिजीटनंतर आयजींनी पोलिस अधीक्षक कार्यालयात येवून गुन्हे आढावा बैठक घेतली, दुपारी बाराच्या सुमारास सुरू झालेली ही बैठक दुपारी दोन वाजता संपली. या बैठकीत आयजींनी पोलिस अधीकार्यांना कर्तव्या संदर्भात अनेक कानमंत्र दिले आहेत. ठाण्यात आलेल्या नागरिकांना न्याय मिळेल या पध्दतीनेच सहकार्य करा, गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाय-योजना करा, गुन्हे प्रलंबित ठेवू नका,वाढत्या चोर्या, गंभीर गुन्हे घडू देवू नका, यासाठी प्रतिबंधात्मक कारवया करा, परिसर स्वच्छ ठेवा असे सांगत एक आदर्श काम उभा करून बीड जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात उंचवा, अशा सुचना आयजींनी यावेळी दिल्या आहेत. या बैठकीला पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार, कविता नेरकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, डीवायएसपी संतोष वाळके, अभिजित धाराशिवकर, स्वप्निल राठोड, जायभाये, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ, बीड शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवि सानप, बीड ग्रामीणचे संतोष साबळे, पेठ बीड ठाण्याचे केदार पालवे, शिवाजीनगर ठाण्याचे केतन राठोड यांच्यासह जिल्ह्यातील इतर पोलिस अधीकार्यांची उपस्थिती होती.
जुन्या मुद्देमालाची निर्गती तात्काळ करा
काही पोलिस ठाण्यात वर्षांनुवर्ष जप्त केलेला मुद्देमाल पडू रहातो, पोलिस ठाण्यात जो मुद्देमाल पडून आहे त्याची तात्काळ निर्गंती करा, अशा सुचनाही यावेळी आयजींनी ठाणेदारांना दिल्या आहेत.