बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या आदर्श कामाची सीईओ अजित पवार यांनी दखल घेतली आणि तब्बल 12 वर्षांपासून रखडलेला ग्रामसेवकांचा आदर्श पुरस्काराचा प्रश्न त्यांनी निकाली काढला, मंगळवारी शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यग्रहात जिल्ह्यातील 119 ग्रामसेवकांचा आदर्श ग्रामसेवक’ म्हणून सीईओंसह इतर अधिकार्यांनी सन्मान केला. हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. विशेष म्हणजे स्मार्ट ग्रामचे ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे यांनी या 12 वर्षात दोन आदर्श पुरस्कारही पटकावले, याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
ग्रामीण भागाच्या विकासात ग्रामसेवकांची भुमिका अत्यंत महत्वाची असते, त्यांच्या सकारात्मक भुमिकेमुळे शासन आणि प्रशासनाने हाती घेतलेल्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचतात आणि त्याचा सर्व सामान्य नागरिकांना लाभ मिळतो, या अनुषंगानेच बीड जिल्ह्यात असे अनेक ग्रामसेवक आहेत जे की निस्वार्थी भावनेने आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे ते जिथे जातील त्या गावाचे कल्याणच होते. मात्र अशाच ग्रामसेवकांचा मागच्या 12 वर्षांपासून आदर्श पुरस्कार रखडलेला होता, मागच्या 12 वर्षांपासून रखडलेला हाच प्रश्न सीईओ अजित पवार आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी.एम. मोकाटे यांनी निकाली काढला, त्यानुसार सन 2008 ते 2009 या वर्षांपासून सन 2019 ते 2020 या वर्षापर्यंत उल्लेखनिय कामगिरी करणार्या 119 ग्रामसेवकांना काल येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. या सन्मानामध्ये सन 2008-2009 या वर्षातील 10, सन 2009-2010 या वर्षातील 9, सन 2010-2011 मधील 10, सन 2011-2012 मधील 11, सन 2012-2013 मधील 11, सन 2013-2014 मधील 7, सन 2014-2015 मधील 10, सन 2015-2016 मधील 11, सन 2016-2017 मधील 11, सन 2017-2018 मधील 9, सन 2018-2019 मधील 10 आणि सन 2019-2020 मधील 10 ग्रामसेवकांचा समावेश होता. विशेष म्हणजे सध्या स्मार्टग्राम असलेल्या आवरगावमध्ये ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे हे कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी या 12 वर्षात आवरगाव आणि बोडखा या ठिकाणच्या आदर्श कामाबद्दल पुरस्कार पटकावला आहे. ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे हे सामाजिक आणि एक सकारात्मक दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून कर्तव्य बजावत आहेत, त्यामुळेच त्यांच्या कामाची सातत्याने जिल्हास्तरावरून दखल घेतली जात आहे. काल झालेल्या सन्मान सोहळ्यात झोंबाडे यांना दोन आदर्श पुरस्कार देवून गौरविण्यात आले. झोंबाडे यांनी दिवसरात्र केलेल्या कामामुळे आवरगाव जिल्ह्यात स्मार्ट ग्राम ठरले. त्याचबरोबर ग्राम स्वच्छतेच्या स्पर्धेत आवरगाव गटात प्रथम, जिल्ह्यात प्रथम आणि विभागातही प्रथम आणण्यास त्यांचे योगदान मोलाचे ठरले, त्यामुळे ते भविष्यात ज्या ज्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावतील, त्या त्या गावाचे कल्याणच होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमाला सीईओ अजित पवारांसह एसीईओ वासूदेव सोळंके, प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानोबा मोकाटे, प्रमोद काळे, प्रदिप काकडे, चंद्रशेखर केकान, कॅफो शिवप्रसाद जटाळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे इतर अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.