बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : येणार्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. परिणामी नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून घ्यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दरम्यान मस्केंनी केलेल्या या मागणीनुसार सरकार नक्कीच तसा निर्णय घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मस्के यांनी एक पत्रच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. आपण मुख्यमंत्री असताना नगराध्यक्ष व सरपंच पदाची निवडणूक जनतेतून घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. हा निर्णय मविआ सरकार राज्यात आल्यानंतर तडकाफडकी बदलण्यात आला. हा निर्णय बदलल्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडीमुळे लोकाभिमुख प्रतिनिधी निवडून येतो. लोकांना अपेक्षित उमेदवारावर जबाबदारी टाकता येते. सरपंच जनतेतून निवडीमुळे ग्रामीण जनता खुश होती. तर नगराध्यक्ष जनतेतून निवडीमुळे नागरिक खुश आणि समाधानी झाले होते. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामधील काँग्रेस राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडीत निघणार होती. केवळ राजकीय हेतूने हा निर्णय बदलण्यात आला. आगामी काळात बीड जिल्ह्यातील 5 नगरपरिषद निवडणुका आणि साधारण 718 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडीचा निर्णय या सरकारने घेतला पाहिजे हा आग्रह जनमतातून व्यक्त केला जात आहे. बीड जिल्ह्यातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन, सरपंच आणि नगराध्यक्ष या पदांची निवडणूक जनतेतून घेण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, असे मस्केंनी या पत्रात म्हटले आहे.