Uncategorized

नेकनूर कुटीर रुग्णालयाच्या 15 कोटी रुपयांच्या नवीन इमारतीस मिळाली प्रशासकीय मान्यता, आ. नमिता मुंदडा यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश


बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यातील मोठी ग्रामीण बाजारपेठ असलेल्या नेकनूर येथील कुटीर रुग्णालयाच्या 14 कोटी 83 लाख रुपयांचा नवीन इमारतीसाठी राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या इमारतीसाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

नेकनूर येथे पूर्वीपासून कुटीर रुग्णालय होते. स्व.डॉ. विमलताई मुंदडा यांनी आरोग्यमंत्री असताना नेकनूर येथे स्वतंत्र स्त्री रुग्णालय सुरु केले. स्त्री रुग्णालये शक्यतो जिल्ह्याच्या ठिकाणी दिली जातात. मात्र, परिसराची निकड लक्षात घेत डॉ. विमलताई मुंदडा यांनी मोठ्या प्रयत्नांनी तालुकाही नसलेल्या नेकनूर येथे स्त्री रुग्णालय उभारले. परिसरातील ग्रामस्थांना या स्त्री रुग्णालयामुळे मोठा दिलासा मिळाला तसेच कुटीर रूग्णालयावरील ताणही कमी झाला. नेकनूर ही बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामीण बाजारपेठ आहे. त्या माध्यमातून आजूबाजूच्या जवळपास 50 गावांचा नेकनूरशी दैनंदिन संपर्क असतो. त्यामुळे वरचेवर कुटीर रुग्णालयात येणार्‍या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत गेली आणि कुटीर रुग्णालयाची इमारत अपुरी पडू लागली. मागील अडीच वर्षापासून ही जीर्ण झालेली इमारत बंदच असल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. विद्यमान आ. नमिता मुंदडा यांनी रुग्णालयाला दिलेल्या भेटीत रुग्णांची गैरसोय स्वतः पाहिली होती. त्यामुळे आ. मुंदडा यांनी शासनदरबारी पत्रव्यवहार करून रुग्णालयास नवीन इमारत द्यावी अशी मागणी सातत्याने लावून धरली. अखेर त्यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे. नेकनूर येथील कुटीर रुग्णालयाच्या अंदाजे 14 कोटी 83 लाख रुपयांच्या इमारतीसाठी राज्य शासनाने गुरुवार (30 जून) रोजी प्रशासकीय मान्यता दिली. या निर्णयामुळे नेकनूर परिसरातील रुग्णांना दिलासा मिळणार असून त्यांची गैरसोय टळणार आहे. यानिमित्ताने परिसरातील ग्रामस्थांनी आ. नमिता मुंदडा यांचे आभार मानले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!