अंबाजोगाई, दि. 22 (लोकाशा न्यूज) : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना तीस हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्यातील अधिकार्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या भ्रष्ट अधिकार्याचा भाजपच्या तालुक्याध्यक्षाने गेम लावला होता.
केज तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनी जिल्हा नियोजन समीती विकास निधी अंतर्गत केज तालुक्यातील गावात सात लाखाचे काम केले. सदरील कामाचे बील काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांनी तीस हजाराची लाच मागितली. यामुळे केदार यांनी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे दुरध्वनीवरून तक्रार नोंदवली.
त्यानुसार एसीबीच्या अधिकार्यांनी अंबाजोगाई येथे येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये कार्यकारी अभियंता कोकणे यांना तीस हजाराची लाच घेताना सापळा रचून रंगेहाथ पकडले. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सदरील कार्यकारी अभियंता कोकणे यांना अधिकार्यांनी बीड येथे घेऊन गेले आहेत. सदरील कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे हे शहरात आले तेव्हापासून वादग्रस्त राहिले आहेत. प्रथम त्यांनी आंबेजोगाई येथे काही लोक माझ्यावर अॅट्रासिटी दाखल करतील अशी तक्रार त्यांनी दिली होती व माझ्या जीविताला धोका असून मला बंदुकीची परवानगी मिळावी म्हणून त्यांनी मागणी केली होती. कोकणे हे ऑफिसमध्ये काम करत असताना मोठा साळसूदपणाचा आव आणत होते मात्र लाच घेताना रंगेहात पकडले यामुळे त्यांचा साळसूदपणा उघडा पडला असून कार्यकारी अभियंता हे मोठे पद असून देखील फक्त तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोकणे यांना रंगेहात पकडले यामुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ. राहूल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी शंकर शिंदे, पोलिस अंमलदार सुरेश सांगळे, हनुमान गोरे, अमाले खरसाडे, संतोष राठोड, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली आहे.