ुबीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : बीडच्या रिक्त असलेल्या पोलीस अधीक्षकपदी नंदकुमार ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी गुरूवारी दुपारी बीड पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारला आहे. तर आज दि. 10 जून रोजी ते औरंगाबाद येथे आयजींसोबत होणार्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
आर.राजा यांची बदली झाल्यानंतर महिनाभरापासून बीड पोलिस अधीक्षकाचे पद रिक्त होते. या पदाचा अतिरिक्त पदभार पंकज देशमुख यांच्याकडे होता. बुधवारी नंदकुमार ठाकूर यांची बीड पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झालेले नंदकुमार ठाकूर हे नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील रहिवासी आहेत. भारतीय प्रशासन सेवेतील जेष्ठ अधिकारी असून त्यांचा बराच कार्यकाळ मुंबईत गेलेला आहे. नांदेड येथे पीसीआर विभागात येण्यापूर्वी नंदकुमार ठाकूर यांनी मुंबईत अनेक हायप्रोफाईल केस सांभाळल्या आहेत. नंदकुमार ठाकूर यांनी यापूर्वी मुंबईत क्राईम ब्रांचला डीसीपी म्हणून काम पहिले आहे. जुलै 2020 मध्ये त्यांची नियुक्ती मुंबईच्या क्राईम ब्रान्चमध्ये झाली होती. त्यावेळी गृहमंत्रालयाने काढलेल्या बदली आदेशाला मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात स्थगिती दिली होती आणि नंतर काही दिवसांनी पुन्हा बदली आदेश काढण्यात आले होते. त्यात नंदकुमार ठाकूर यांना मुंबईच्या क्राईम ब्रान्चमध्ये नेमणूक मिळाली होती. मुंबईत गाजलेल्या सोशल मीडिया फेक लाईक केसवर नंदकुमार ठाकूर यांनी काम केले होते. या केसमध्ये बॉलिवूडमधील काही आसामी आरोपी होत्या. त्यानंतर मुंबईतीलच अर्णव गोसावीशी संबंधित टीआरपी घोटाळ्याचा तपास नंदकुमार ठाकूर यांच्याकडेच होता. यातापासादरम्यानच त्यांची गुन्हे शाखेतून मुंबईच्या वाहतूक शाखेत बदली झाली होती. मुंबईत जाण्यापूर्वी ठाकूर यांनी जळगाव, रत्नागिरी, गोंदिया आदी ठिकाणीही काम केलेलं आहे. तसेच त्यांना अनेक सन्मान देखील मिळालेले आहेत. त्यांनी गुरूवारी पंकज देशमुख यांच्याकडील बीड पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारला आहे. ते आज दि. 10 जून रोजी आयजींसोबत होणार्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.