Uncategorized

पंकजाताई मुंडेंच्या हस्ते श्रीक्षेत्र नारायण गडावरील महंतांच्या निवास वास्तूचे थाटात पूजन,पायरी बनून गडाची सेवा करता आली हे माझं भाग्यच – पंकजाताई,जातपात न मानता जिल्हयाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले,पंकजाताई तुमच्या ‘ताई’ पण आमच्यासाठी मात्र ‘आई’ – महंत शिवाजी महाराजांनी केला गौरव

बीड ।दिनांक २७।
दुधापेक्षा दूधावरची ‘साय’ जशी महत्वाची तसं लेकीपेक्षा ‘नात’ महत्वाची असते, तसं माझं आणि गडाचं नातं आहे. पायरी बनून गडाची सेवा मला करता आली हे मी माझं भाग्य समजते. गडाचं बदललेलं रूप, झालेली कामे आणि वास्तू पाहून आनंद वाटला. नगद नारायणाच्या आशीर्वादाने भविष्यातही गडाची अशीच सेवा माझ्या हातून निश्चित होईल असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी श्रीक्षेत्र नारायण गड येथे व्यक्त केला. दरम्यान, पंकजाताई हया तुमच्यासाठी ‘ताई’ असल्या तरी आमच्या मात्र ‘आई’ आहेत, नगद नारायणाचा आशीर्वाद त्यांच्या पाठिशी सदैव राहील. असेच प्रेम कायम रहावे अशा शब्दांत गडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज यांनी आशीर्वाद दिले.

महाराष्ट्राची धाकटी पंढरी आणि बीड जिल्हयाचं अध्यात्मिक दैवत असलेल्या श्रीक्षेत्र नारायण गड येथे संस्थानचे महंत प.पू. शिवाजी महाराज यांच्या निवास वास्तूचे पूजन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज मोठया थाटात आणि भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. गडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज यांचेसह विश्वस्त राजेंद्र जगताप, दिलीप गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, जयश्री मस्के, ॲड महादेव तुपे, बी बी जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बळीराम गवते, गोवर्धन काशीद आदी यावेळी उपस्थित होते.

पंकजाताई म्हणाल्या, मी लोकनेते मुंडे साहेबांसोबत पहिल्यांदा गडावर आले होते, तेव्हापासून माझं इथलं नातं तयार झालं. गडानं मला नात मानलं, ही माया अशीच अपरंपपार रहावी अशी प.पू. नगद नारायणाच्या चरणी प्रार्थना...इथे येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून  जिल्हयाची पालकमंत्री असताना श्रीक्षेत्र नारायण गडाचे सुशोभिकरण आणि विविध विकास कामांसाठी भरीव निधी दिला होता.आज गडावर झालेली कामे आणि पुर्णत्वास आलेली वास्तु पाहून खूप आनंद वाटला. काही कामासाठी वाढीव निधी देण्याची मागणी याठिकाणी झाली. तुमचे आशीर्वाद मला गडासाठी १५ लक्षच काय? १५ कोटी देण्याची शक्ती माझ्यात आणतील.  आज माझ्याकडे पद, सत्ता नसताना सुध्दा तुम्ही अपेक्षा ठेवणं हे माझ्यावरील तुमच्या विश्वासाची पावतीच आहे. खासदार डॉ.प्रितमताई व मी गडाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहोत.  प.पू.श्री नगद नारायण यांचा आशीर्वाद आणि तुमची साथ अशीच कायम मिळो अशी प्रार्थना त्यांनी  मनोगतात व्यक्त केली.

वंचिताचा विकास करणं हे मुंडे साहेबांचे संस्कार

जिल्हयाची पालकमंत्री होते तेव्हा सत्तेच्या माध्यमातून विकास कामे करताना किंवा निधी देताना कुठेही मी जातपात मानली नाही की निवडणूकीत मतं कमी मिळाली म्हणून भेदभाव केला नाही. सर्वाना समान निधी दिला. वंचितांचा विकास करणं हे आमच्यावर झालेले मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. साहेब नसले तरी त्यांच्या विकासासाठी आयुष्यभर संघर्ष करेन. ओबीसी तसेच मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाहीत तोपर्यंत हार, फेटा स्विकारणार नाही असे पंकजाताई म्हणाल्या. माझ्यापेक्षा मुंडे साहेबांवर तुमचं जास्त प्रेम होतं. वडिलांची आठवण जतन करण्यासाठी मी त्यांचं स्मारक बांधलं. आज गोपीनाथ गडावरून अनेक जण उर्जा घेऊन जातात, हे स्मारक आजच्या तरूणांना प्रेरणा देत राहील असं त्या म्हणाल्या.

ह.भ.प. शिवाजी महाराज

यावेळी बोलतांना गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी पंकजाताई मुंडे यांचे कौतुक करत आशीर्वाद दिले. ते म्हणाले, पंकजाताई हया तुमच्यासाठी ‘ताई’ असल्या तरी आमच्या ‘आई’ आहेत, नगद नारायणाचा आशीर्वाद त्यांच्या पाठिशी सदैव राहील. असेच प्रेम कायम रहावे.

प्रारंभी पंकजाताई मुंडे यांचे गडावर आगमन होताच वाजत-गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. गडाच्या वतीने त्याचं स्वागत झालं. प.पू. नगद नारायणाचे दर्शन घेऊन महंतांच्या वास्तूचे त्यांनी पूजन केले. पंचक्रोशीतील भाविक भक्तगण यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!