Uncategorized

मेडिकल प्रवेशाचे आमिष दाखवून १४ लाख रुपये लुबाडणारे भामटे मुद्देमालासह जेरबंद ; परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांची धडाकेबाज कारवाई

परळी वैजनाथ दि २० ( लोकाशा न्युज ) : – ‘नीट’ परिक्षा उत्तीर्ण झालेल्या तुमच्या मुलीला आम्ही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देऊ असे आमिष दाखवून दोन भामट्यांनी तिच्या पालकांकडून १४ लाख रुपये लुबाडले होते मात्र नंतर महाविद्यालयात प्रवेशही मिळवून दिला नाही. याबाबत जाब विचारून पैशाची परत करण्याची मागणी केली असता आरोपींनी धमक्या दिल्या आणि रक्कम परत करण्यासही नकार दिल्याच्या आरोपावरून त्या दोन भामट्यांवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी तपासाची वेगवान चक्रे फिरविली प्रकरणातील आरोपींच्या पुणे येथे मुद्देमालासह मुसक्या आवळून जेरबंद केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनीषा नंदकुमार फड (रा. माधवबाग, परळी) यांनी फसवणुकीची तक्रार दिली होती की त्यांची मुलगी गतवर्षी नीट परिक्षा उत्तीर्ण झाली. तिच्या वैद्यकीय प्रवेशासाठी कुटुंबीय प्रयत्नात होते. त्या दरम्यान मनीषा यांचे दिर सुनील श्रीरंग फड यांना युवराज सिंग उर्फ सोनू कुमार आणि नितांत गायकवाड (रा. पुणे) या दोघांनी कॉल
केला आणि पुण्यात त्यांची कन्सलटन्सी असल्याचे सांगितले. नीट परिक्षा उत्तीर्ण झालेल्या तुमच्या मुलीला आम्ही पोंडीचेरी येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देऊ. त्यासाठी पाच वर्षाच्या खर्चासह ७५ लाख रुपये लागतील असे त्यांनी सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन फड यांनी मुलीचे शैक्षणिक कागदपत्रे आणि पहिल्या टप्प्यातील मागणीनुसार एकूण १४ लाख रुपये त्यांना ८ फेब्रुवारी रोजी पाठविले. त्यानंतर २२ मार्च रोजी आणखी ५ लाख रुपये त्या दोघांच्या पुण्यातील ऑफिसमध्ये नेऊन दिले. नंतर तुमची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे म्हणून त्यांनी फड कुटुंबियांना पोंडीचेरी येथे बोलावून घेतले. मात्र, तिथे गेल्यानंतर युवराज सिंग याने या कॉलेजचे प्रवेश बंद झाले आहेत असे सांगून इतर कॉलेजमध्ये प्रवेश देतो अशी बतावणी करू लागला. त्याच्या अविर्भावावरून तो फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्याने फड यांनी
आम्हाला प्रवेश घ्यायचा नाही, आमचे पैसे परत कर असे त्याला सांगितले. त्यानंतर युवराज सिंगने पाच लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित १४ लाख रुपये देण्यास टाळाटाळ करून अद्यापही त्याने ती रक्कम परत केली नव्हती अखेर हताश झालेल्या मनीषा फड यांनी संभाजीनगर पोलीस ठाणे गाठीत सारा प्रकार पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांना सांगितला व पोलीसात तक्रार दिली. सदर तक्रारीवरून पो नी सुरेश चाटे यांनी क्षणाचाही विलंब न करता संभाजीनगर पोलीस ठाण्यात युवराज सिंग आणि नितांत गायकवाड दोघेही राहणार पुणे यांच्या विरोधात संभाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा गु र नंबर ९६/२०२२ कलम ४२०, ५०६, ३४ दिनांक १९/५/२०२२ नुसार दाखल केला होता.
मुलांच्या भविष्यासाठी काबाडकष्ट केलेली रक्कम भामट्यांनी हडपल्यामुळे फिर्यादी मनीषा फड हताश झाल्या होत्या मात्र संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवीत आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चांद मेंडके, डीबी शाखेचे सचिन सानप, पोलीस कॉन्स्टेबल सरवदे आदींना तपासकामी पुण्यास पाठवले. सदर पथकाने अत्यंत शिताफीने पुणे येथे जाऊन आरोपी युवराज सिंग, नितांत गायकवाड यांच्या पूर्ण रक्कम १४ लाखांसह मुसक्या आवळीत जेरबंद केले. आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांची चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली. अत्यंत कमी वेळात मुद्देमालासह भामटे जेरबंद केल्यामुळे संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साठे पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके डीबी शाखेचे सचिन सानप, पोलीस कॉन्स्टेबल सरवदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!