मुंबई ।दिनांक २७।
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने राज्य सरकारने महामानव, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीस परवानगी द्यावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पुढील महिन्यात १४ एप्रिल रोजी आहे. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण राज्यात कोरोना महामारीचा उद्रेक होता आणि रूग्णांची संख्या देखील मोठया प्रमाणात होती. कोरोनामुळे जाहीर कार्यक्रम तसेच मिरवणूकांवर निर्बंध लावण्यात आले असल्याने आंबेडकर प्रेमींना जयंती उत्सव मोठया प्रमाणात साजरा करता आला नाही, तथापि आता महाराष्ट्रात कोरोना कमी झाला आहे आणि रूग्ण संख्या देखील झपाट्याने घटली आहे. शिवाय मार्च अखेरीस कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्याचे संकेत केंद्र सरकारकडून मिळाले आहेत. महाराष्ट्रात देखील निर्बंध हटणार असतील किंबहूना सरकारी पातळीवर तशा हालचाली सुरू असतील तर १४ एप्रिल रोजी डाॅ. आंबेडकर जयंतीनिमित्त होणारे कार्यक्रम आणि जाहीर मिरवणूकीस परवानगी द्यावी जेणेकरून आंबेडकर प्रेमी जनतेचा उत्साह पुन्हा द्विगुणित होईल.राज्यातील सर्व आंबेडकर प्रेमी बांधवांचा विचार करून लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटवावे आणि संपूर्ण राज्यात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीस परवानगी द्यावी, अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी सरकारला केली आहे.
••••