बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : सर्व घटकांना पुढे घेवून जाण्याचे काम जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार हे करीत आहेत. विशेष म्हणजे शेतकर्यांना आर्थिक बळ देण्यासाठीही ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्याअनुषंगानेच त्यांच्या पुढाकारातून आज दि. 23 फेब्रुवारी रोजी बीड जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये रेशीम शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा पार पडणार आहे. या कार्यशाळेला तब्बल दोनशे शेतकरी उपस्थित राहणार असून यामध्ये रेशीमबद्दल शेतकर्यांना धडे मिळणार आहेत. दरम्यान या कार्यशाळेमुळे जिल्ह्यात भविष्यात नक्कीच रेशीम उद्योगाला गती मिळणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
जगाचा पोशिंदा म्हणून शेतकर्यांकडे पाहिले जाते, त्यामुळे शेतकरी जगला तर देश, जग जगणार आहे, परिणामी शेतकर्यांचे हात बळकट करणे काळाची खरी गरज आहे, अगदी हेच गणित लक्षात घेवून सीईओ अजित पवार यांनी जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगानेच आज त्यांच्या पुढाकारातून बीड जिल्हा परिषदेच्या कार्यालयात रेशीम शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा होणार आहे. सकाळी आकरा वाजता सुरू झालेली ही कार्यशाळा सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. जिल्हा परिषद बीड आणि जिल्हा रेशीम कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीईओ अजित पवार असणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रेशीमचे उपसंचालक दिलीप हाके, परभणी रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी रोहयोचे उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकट, जिल्हा कृषी अधिकारी बी.के. जेजूरकर यांची उपस्थिती राहणार आहे. यामध्ये नागपूर येथील प्रगतीशील रेशीम शेतकरी लकूळ बाबूराव कदम, तांत्रिक सहाय्यक एम.आर. डिगुळे, सुदाम धोंडीराम पवार हेही यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात शेतकर्यांनी रेशीमची शेती कशी करावी आणि त्यातून कशा प्रकारे स्वत:ची उन्नती करावी, यावर मार्गदर्शन करून शेतकर्यांना बळ दिले जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी विनीत सुरेश पवार यांनी केले आहे.
प्रशासनाच्या खंबीर साथीमुळे शेतकर्यांच्या
खांद्यावरील ओझं कमी होणार
शेतकर्यांना पावलोपावली अडचणी येतात, मात्र येणार्या अशा अडचणींवर मात करून शेतकरी मार्ग काढतोच, आता सीईओ अजित पवार हे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले आहेत, त्यांच्या या खंबीर साथीमुळेच जिल्ह्यातील शेतकर्यांच्या खांद्यांवरील ओझं कमी होणार आहे.