बीड (प्रतिनिधी):- बीड शहरात सध्या दहा दिवसाआड तर विस्तारीत भागामध्ये पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यातून मार्ग काढुन शहराला तीन दिवसाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी अमृत पाणी पुरवठा योजनेला वीज कनेक्शन जोडण्याची आवश्यकता आहे. तसेच मलनिसारण प्रकल्पासाठी एसटीपी प्लांटची जागा उपलब्ध व्हावी या अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी नगर विकास तथा उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या पुढाकारातून बैठक झाली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार दोन्ही प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत. हे प्रश्न सुटल्यानंतर बीडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
शुक्रवार दि.4 फेब्रुवारी रोजी नगर विकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बीड शहरातील अमृत योजनेचे वीज कनेक्शन जोडण्यासाठी येणार्या तांत्रिक अडचणी व एसटीपी प्लांटच्या जागेबाबत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या पुढाकारातून मंत्रालयात आढावा बैठक बोलवण्यात आली होती. बीड शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अमृत योजनेचे वीज कनेक्शन जोडणे गरजेचे आहे. परंतू या तांत्रिक अडचणी येत असल्याने अमृत योजनेला महावितरणकडून विज कनेक्शन दिले जात नव्हते. बीड नगर परिषदेवर मोठी थकबाकी आहे. या थकबाकीमुळे वीज कनेक्शन दिले जात नसल्यामुळे नियमीत पाणी पुरवठा होण्याप्रश्नी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या पुढाकारातून उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बीड शहरातील पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी तातडीने वीज कनेक्शन जोडणे व मल:निसारण प्रकल्पासाठी जागा उपलब्धतेबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार बीड शहराच्यादृष्टीने महत्त्वाची असलेले हे दोन्ही प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत. मंत्रालयात झालेल्या बैठकीला आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या समवेत माजी आ.सय्यद सलीम, नगरविकास विभागाचे उपसचिव पप्पू जाधव, कक्ष अधिकारी आलेवाड, न.प.चे मुख्याधिकारी गुट्टे, अभियंता टाळके, मुख्य अभियंता महावितरणचे पाटील, तसेच प्रकाशगड येथील मुख्यअभियंता बनसोडे आदींची उपस्थिती होती.