अंबाजोगाई – मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास रूग्णवाहिका देण्यात आली असून आज (दि.10) आ.सतीश चव्हाण, आ.संजय दौंड यांच्या हस्ते फीत कापून या रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्याकडे आ.सतीश चव्हाण यांनी रूग्णवाहिकेची चावी सुपूर्द केली.
कोवीड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तसेच जिल्हास्तरावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने 16 एप्रिल 2021 रोजी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना सन 2021-22 या आर्थिक वर्षात रू. 1 कोटी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. आ.सतीश चव्हाण यांचा मतदारसंघ हा संपूर्ण मराठवाडा असल्याने कोवीड-19 च्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेला निधी त्यांनी मराठवाड्यातील विविध शासकीय रूग्णालयांना यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी दिला आहे. काही महिन्यांपूर्वी आ.सतीश चव्हाण यांनी अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास भेट दिली असता रूग्णालयासाठी रूग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असून याठिकाणी रूग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रूग्णालय प्रशासनाच्यावतीने आ.सतीश चव्हाण यांच्याकडे करण्यात आली होती. आ.सतीश चव्हाण यांनी लागलीच रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आ.सतीश चव्हाण यांनी दिलेल्या शब्दाची आज पूर्तता केली.
राज्यात पुन्हा एकदा कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आपली वैद्यकीय सेवा देणारी यंत्रणा सर्व बाजूने सज्ज असणे आवश्यक आहे. रूग्णवाहिके अभावी कुणालाही प्राण गमवावा लागू नये यासाठी मी माझ्या आमदार निधीतून अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयासाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. अंबाजोगाई परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ही रूग्णवाहिका उपलब्ध राहणार असून रूग्णांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास या रूग्णवाहिकेची नक्कीच मदत होईल असा विश्वास आ.सतीश चव्हाण यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
याप्रसंगी मा.आ.पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे, दत्तात्रय पाटील, अमर देशमुख, अ.र.पटेल, बालाजी शेरेकर, अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, डॉ.सिध्देश्वर बिराजदार, डॉ.राकेश जाधव, डॉ.नितीन चाटे, डॉ.प्रशांत दहिरे, डॉ.विनोद वेदपाठक, डॉ.सुधीर भिसे, डॉ.विश्वजीत पवार, डॉ.अमित लोमटे, डॉ.शंकर धपाटे, रणजित मोरे, गोविंद टेकाळे आदींची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन- आ.सतीश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास देण्यात आलेल्या रूग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आ.सतीश चव्हाण, आ.संजय दौंड, मा.आ.पृथ्वीराज साठे, डॉ.नरेंद्र काळे, अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे आदी.