बीड, दि.29 (लोकाशा न्यूज) : शहरापासून जवळच असलेल्या चर्हाटा फाटा परिसरातील जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मंगळवारी (दि.28) रात्री छापा टाकला. यावेळी 48 जुगार्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह आलिशान कार, मोबाईल असा 75 लाख 62 हजार 270 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 48 जण पोलिसांच्या ताब्यात असून इतर दोघे फरार आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचाही आरोपीत समावेश करण्यात आला आहे.
बीड शहरपासून जवळच असलेल्या चर्हाटा फाटा येथील जागेत यश स्पोर्टस या नावाने क्लब सुरू होता. याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. या क्लबवर त्यांनी मोठा फौजफाटा घेवून रात्री उशीरा छापा मारला असता यावेळी 48 जुगार्यांना पकडण्यात आले, तसेच त्यांच्याकडून दीड लाख रोख, चार व्हीआयपीसह 33 गाड्या, मोबाईल असा एकूण 75 लाख 62 हजार 270 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पकडलेल्या आरोपींच्या सांगण्यावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत बीड ग्रामीण ठाण्यात पोलिस कर्मचारी बालाजी दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम 4,5, महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार 50 जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय आवारे हे करीत आहेत.