Uncategorized

शिक्षण विभागात खळबळ, टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे सेवानिवृत्त आयुक्त सुखदेव डेरे यांनाही ठोकल्या बेड्या


बीड-आरोग्य विभाग,म्हाडा नंतर उघडकीस आलेल्या टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे सेवानिवृत्त आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक झाल्याने खळबळ माजली आहे.डेरे यांनी 2017 मध्ये टीईटी पेपरफोडी चा प्रकार केल्याचे उघड झाले आहे.
टीईटीच्या परिक्षेतील गैरप्रकार हे जेव्हापासून जीए टेक्नॉलॉजीला परीक्षा विभागाचे कंत्राट मिळाले तेव्हापासून म्हणजे, 2017 पासुन सुरु होते, असं आता स्पष्ट झालंय. याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी आणखी दोन महत्वाच्या व्यक्तींना या प्रकरणात अटक केली आहे. यातील पहिली अटक आहे, जीए टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख अश्विन कुमार याची. अश्विन कुमारला पुणे पोलीसांनी बंगळुरूमधून अटक केली आहे. तर दुसरी महत्त्वाची अटक आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांची.
डेरेंना संगमनेर तालुक्यातील त्यांच्या मुळ गावातून पोलिसांनी अटक केली आहे. अश्विन कुमार हा आधीपासून या प्रकरणात अटकेत असलेल्या प्रितेश देशमुखचा वरिष्ठ आहे. तर सुखदेव डेरे हे 2017 साली जेव्हा जीए टेक्नॉलॉजीला शिक्षण परिषदेकडून परीक्षा घेण्याचे कंत्राट मिळाले होते, तेव्हा शिक्षण परिषदेचे आयुक्त होते.
या सगळ्यांनी मिळून 2018 साली झालेल्या टीईटी परीक्षेतही अशाचप्रकारे अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याच समोर आलं आहे. जीए टेक्नॉलॉजी या कंपनीकडे 2017 ते 2020 या काळात शिक्षण परिषदेचं परीक्षा घेण्याचं कंत्राट होतं. मधल्या काळात सुखदेव डेरे हे सेवानिवृत्त झाले आहेत.
या सगळ्या प्रकारावरून शिक्षण विभागातील आणखी काही बडे मासे यात सहभागी असण्याची अन त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!