बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : सन 2022-23 यावर्षीतील डीपीसीच्या सर्वसाधारण योजनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याची प्रक्रिया नियोजन विभागाने हाती घेतली आहे. याअनुषंगानेच गुरूवारी बैठक घेवून आगामी वर्षातील डीपीसीचा 288 कोटींचा आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्हा नियोजन विभागाला दिले आहेत. येत्या तीन दिवसात हा आराखडा तयार केला जाणार आहे. वास्तविक पाहता हा आराखडा 288 कोटींचा तयार केला जाणार असला तरी डीपीसीच्या सर्वसाधारण योजनेसाठी 380 कोटी रूपये मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करून जिल्हा नियोजन अधिकारी अर्पणा गुरव यांनीही आपला विभाग आराखडा तयार करण्यासाठी गतीने कामाला लावला आहे.
डीपीसीच्या निधीमुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळते, याअनुषंगानेच दरवर्षी डीपीसीचा निधी खर्च करण्यासाठी योग्य असे नियोजन केले जाते, कोरोनाच्या संकटामुळे मागच्या दोन वर्षात डीपीसीचा निधी खर्च करताना जिल्हा प्रशासनासमोर अनेक अडचणी आल्या, मात्र प्रत्येक अडचणींवर मात करून डीपीसीचा निधी खर्च करण्यात आला, सन 2021-2022 या वर्षात सुरूवातीला डीपीसीच्या सर्वसाधारण योजनेचा 242 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला होता, त्यानंतर मात्र डीपीसीसाठी 340 कोटी रूपये मंजूर झाले, आणि विशेष म्हणजे हा निधीही जिल्हा नियोजन विभागाला प्राप्त झालेला आहे. सन 2021-22 हे वर्ष पुर्णत्वास जात आहे. त्यामुळेच पुढील म्हणजेच सन 2022-23 या वर्षातील डीपीसीच्या सर्वसाधारण योजनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याची प्रक्रिया जिल्हा नियोजन अधिकारी अर्पणा गुरव यांनी हाती घेतली आहे. या अनुषंगानेच गुरूवारी येथील नियोजन विभागाच्या कार्यालयात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी अर्पणा गुरव यांनी बैठक घेतली. पुढील वर्षी डीपीसीच्या सर्वसाधारण योजनेतून 288 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. जिल्ह्याचा शाश्वत विकास डोळ्यासमोर ठेवून हा आराखडा तयार केला जाणार आहे. विशेष म्हणजे महिला व बाल कल्याण या विभागासाठी 3 टक्के निधी तर शाश्वत विकासासाठी एक टक्का निधी राखीव ठेवला जाणार आहे. आज दि. 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये हा प्रारूप आराखडा तयार केला जाणार आहे. आराखडा तयार झाल्यानंतर तो पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या डीपीसीच्या बैठक मांडला जाणार आहे. दरम्यान आगामी वर्षातील डीपीसीचा प्रारूप आराखडा 288 कोटींचा तयार होणार असला तरी भविष्यात मात्र डीपीसीसाठी 380 कोटी रूपये मंजूर होण्याची शक्यता आहे.
2021-22 मधील कामांचा निधी नव्या
वर्षात होणार वितरीत
सन 2021 – 22 मधील डीपीसीचे 340 कोटी जिल्हा नियोजन विभागाकडे प्राप्त आहेत, या वर्षातील सर्व कामांना डिसेंबर अखेरपर्यंत प्रशासकिय मान्यता दिली जाणार आहे. तर नव्या वर्षापासून या सर्व कामांचा निधी वितरीत केला जाणार आहे.