बीड : राज्यात सध्या नगरपालिकांसोबतच जिल्हापरिषद निवडणुकांचेही वेध लागलेले आहेत. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची पुनर्रचना करण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाने दिले आहेत . त्यानूसार आता बीड जिल्हा परिषदेत यावर्षी आणखी एका गटाची भर पडणार असून केज तालुक्यात हा गट वाढणार आहे. यामुळे बीड जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 61 इतकी होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट , गण पनर्रचना करण्याचे आदेश आठ दिवसांपूर्वी राज्य निवडणुक आयोगाने दिले होते . आता आयोगाने प्रत्येक जिल्हापरिषदेसाठीची सदस्य संख्या निश्चित केली आहे . त्यानूसार बीड जिल्हा परिषदेत 61 सदस्य राहणार आहेत. यापूर्वी बीड जिल्हा परिषदेत साठ सदस्य होते. आता केज तालुक्यातील ग्रामीण लोकसंख्या 2 लाख 13 हजार 128 इतकी नोंदविण्यात आली आहे. यामुळे केज तालुक्यात 1 जिल्हा परिषद गट वाढणार असल्याचे निवडणुक आयोगाने कळविले,
पूर्वी केज तालुक्यात 6 जिल्हापरिषद गट होते आता पूनर्रचनेत जिल्हापरिषदेचे सात गट आणि पंचायत समित्यांचे 14 गण तयार करावे लागणार आहेत. तर बीड जिल्ह्यातील पंचायात समिती सदस्यांची संख्या आता 122 होणार आहे . केज तालुक्यात एक जिल्हापरिषद गट वाढत असल्याने आता सध्याच्या कोणत्या गटांमधून कोणती गावे बाहेर पडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. हे करताना कोणाची राजकीय पंचायत होते आणि कोणाची गैरसोय होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.