पाटोदा : लोकाशा न्यूज
श्रीगोंदा तालुक्यातील वडघुल खांडगाव ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडघुलचे उपसरपंच रामदास बन्सी घोडके आणि खांडगांव येथील ग्रामपंचायत सदस्या सुनंदा शिंदे यांचा मुलगा आनंदा शिंदे यांच्या विरुध्द श्रीगोंदा पोलिस ठाण्यात मृत ग्रामसेवकाची पत्नी मनिषा झुंबर गवांदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील मांडवगण येथील रहिवासी झुंबर मुरलीधर गवांदे वडघुल खांडगांव ग्रुप ग्रामपंचयतमध्ये ग्रामसेवक पदावर कार्यरत होते. दरम्यान येथील उपसरपंच रामदास बन्सी घोडके व आनंदा शिंदे यांनी गावातील फॉरेस्टच्या जमिनीवरील गावकऱ्यांनी केलेले बेकायदेशीर अतिक्रमण कायदेशीर करत त्याची नोंद रजिस्टरला करण्यासाठी दबाव आणत होते.
मात्र गवांदे यांनी या कामासाठी नकार दिल्याने घोडके आणि शिंदे यांनी गवांदे यांना कार्यालयातुन बाहेर काढत कार्यालयाला कुलुप लावुन तुम्ही आमचे काम करत नाही तोपर्यत कामावर यायचे नाही.
असे म्हणुन कामावरुन हाकलुन लावले तसेच घोडके याने गवांदे यांच्या विरुध्द वरिष्ठांकडे खोटे तक्रारी अर्ज देवुन त्यांच्यावर बेकायदेशीर काम करण्यासाठी दबाव आणला.
तसेच दोघांनी सप्टेंबर महिन्यात झालेल्या ग्रामसभेच्यादिवशी ग्रामपंचायत कार्यालयात गवांदे यांना सर्वासमक्ष झाडु मारायला लावुन त्याचा व्हीडीओ व्हायरल केला.
घोडके याने दिलेल्या खोट्या अर्जामुळे गवांदे यांना आपल्या मोठ्या मुलीच्या किडनीच्या ऑपरेशनवेळी त्यांचा रजेचा अर्ज नाकारला. या सर्व गोष्टींचा त्रास
असह्य झाल्यामुळे गवांदे यांनी दि.२४ सप्टेंबर रोजी पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील धबधब्यात उडी मारुन आत्महत्या केली. अशी फिर्याद मनिषा झुंबर गवांदे यांनी दिली. गवांदे यांचा मृतदेह आठ दिवसांनंतर सापडला होता.
या फिर्यादीवरून वडघुलचे उपसरपंच रामदास बन्सी घोडके आणि खांडगांवचे ग्रामपंचायत सदस्य सुनंदा शिंदे यांचा मुलगा आनंदा शिंदे यांच्या विरुध्द श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.