बीड, दि. 1 (लोकाशा न्यूज) : चार दिवसात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील खरीप पिकांचे होत्याचे नव्हते केले, यानंतर जिल्ह्यातील शेतकर्यांनी विमा कंपनीकडे अक्षरक्ष: तक्रारींचा पाऊसच पाडला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील 15 लाखाहून अधिक शेतकर्यांनी आमचे मोठे नुकसान झाले असल्याच्या तक्रारी विमा कंपनीकडे केल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त आकडा बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचा आहे. जिल्ह्यातील तब्बल तीन लाख 38 हजार शेतकर्यांनी विमा कंपनीकडे आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामुळेच आता विमा कंपनी या तक्रारींची कशा प्रकारे दखल घेते याकडे जिल्ह्यातील संपूर्ण शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
मागच्या महिणाभरापासून बीड जिल्ह्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे. या पावसामुळे खरीपातील सर्वच पीके उद्वस्थ झाली आहेत. या धरतीवरच शेतकर्यांनी आपल्या पीकाच्या नुकसानीची तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाबरोबरच विमा कंपनीने केले होते. त्यानुसार काही जणांनी विमा कंपनीकडे ऑफलाईन तर काही जणांनी ऑनलाईन तक्रारी नोंदविल्या आहेत. राज्यातील 15 लाखाहून अधिक शेतकर्यांनी आमची पीके पावसाने उद्वस्त झाली असे आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारी करणार्यांमध्ये जिल्ह्यातील 3 लाख 38 हजार शेतकर्यांचा समावेश आहे. त्यामुळेच आता या तक्रारींवर विमा कंपनी आता कोणता निर्णय घेते याकडे जिल्ह्यातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
राज्याने पहिला हप्प्यातपोटी 936 कोटी दिले
आता विमा कंपनी शेतकर्यांना 25 टक्के अॅग्रीम कधी देणार
खरीप 2021 च्या विम्यापोटी राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा पहिला 936 कोटी रूपयांचा हप्ता विमा कंपनीकडे दिला आहे. त्यामुळेच आता बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना विमा कंपनी 25 टक्के अॅग्रीम कधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी विमा कंपनीकडे 25 टक्के अॅग्रीमचा प्रस्ताव पाठवलेला आहे.