Uncategorized

अतिवृष्टीमुळे मराठवाडयातील शेतकऱ्यांवर मोठं संकट,केवळ घोषणा नको ; तातडीने प्रत्यक्ष मदत द्या – पंकजाताई मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र,पाहणी दौर्‍यानंतर लगेचच सरकारपुढे मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा !

मुंबई । दिनांक०१।
अतिवृष्टीमुळे मराठवाडयातील शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने त्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. पॅकेजची केवळ घोषणा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत दिली जावी आणि त्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावीत अशी अपेक्षा व मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे. पाहणी दौर्‍यानंतर लगेचच त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा पत्राद्वारे सरकारपुढे मांडल्या.

मराठवाडयातील सर्व जिल्हयात नुकतीच जोरदार अतिवृष्टी झाली, अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या. सर्वच छोटया, मोठ्या नद्या,नाले दुथडी भरून वाहिल्याने शेतात पाणी घुसून उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी जिवित व वित्त हानी झाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावून घेतला, ज्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट आले.

मराठवाडा विभागात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान प्रचंड आहे. ३५ लाख ६४ हजार शेतकऱ्यांची तब्बल २५ लाख हेक्टर शेतजमीन उद्ध्वस्त झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात ९१ जणांचा मृत्यु झाला पैकी २२ बळी गेल्या दोन दिवसात झाले. आठ जिल्हयात ४ हजार ३९० किलोमीटर लांबीचे रस्ते आणि १ हजार ७७ पुल खराब झाले. ११६ सरकारी इमारती, ७१ जिल्हा परिषद शाळा आणि २०५ तळ्यांनाही पावसाचा जोरदार तडाखा बसला. अतिवृष्टीने बळीराजा पुर्ण कोलमडून गेला असून त्याला मदतीचा हात देण्याची नितांत गरज आहे.

पिकांसह शेत जमिनीचीही सरसकट नुकसान भरपाई द्या

इतर जिल्हयाप्रमाणेच बीड जिल्हयातही अशीच भयानक अवस्था निर्माण झाली आहे. पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यांना मदत तर मिळायलाच हवी पण त्याचबरोबर जमिनीची माती देखील वाहून गेली आहे, त्याचीही विशेष नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट तर आलेलेच आहे पण आता त्यांचेवर सुलतानी संकट येऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी. सर्व नुकसानीचे सरसकट पंचनामे करून त्यांना मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे. केवळ घोषणा करून भागणार नाही तर तातडीने व वेळेवर मदत प्रत्यक्ष द्यावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह उप मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार, सर्व संबंधित मंत्री तसेच दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांनाही हे निवेदन पाठविण्यात आले आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!