Uncategorized

बळीराजाच्या डोळ्यातील पाणी दिसेना, उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री नाहीत का ?भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचा सवाल

बीड प्रतिनिधी

मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे पिके भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता हेक्टरी ५० हजार रु. मदत जाहीर करावी. अशी मागणी सर्व स्तरातून टाहो फोडून केली जात आहे. नैसर्गिक आपत्तीत सापडलेला बळीराजा गुडघ्यात तोंड खुपसून आसू गाळत असताना. मुख्यमंत्री महोदयांना शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी दिसत नाही. कठीण प्रसंगात राज्य सरकारने हात झटकने योग्य नाही.
जबाबदार मंत्री गणांना अद्याप जाग आली नाही. मुख्यमंत्री नुकसान भरपाई बाबत चकार शब्दही अद्याप बोलत नाहीत. उद्धव ठाकरे केवळ मुंबईचे मुख्यमंत्री असल्या सारखे वागत आहेत. ग्रामीण जनतेकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री नाहीत का? असा सवाल भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी उपस्थित केला आहे.
अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांना पंचनाम्याचे सोंग न घेता सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयाची नुकसान भरपाई देऊन त्याच्या पाठीशी समर्थपणे उभे राहावे अशी मागणी राज्य सरकार कडे होत असताना,अद्याप ठाकरे सरकारने कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही. शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता
राज्य सरकारने ताबडतोब शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी राजेंद्र मस्के प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
शेतकऱ्यांचे एवढे नुकसान होऊनही आघाडी सरकारमधील मराठवाड्याचे मंत्री चकार शब्द उच्चारत नाहीत याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे , असेही त्यांनी म्हटले आहे.
श्री राजेंद्र मस्के यांनी पत्रकात म्हटले आहे की, मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे जवळपास ४० लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. विविध कारणांमुळे अडचणीत सापडलेला शेतकरी वर्गापुढे जगायचं कसं असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे राज्य शासनाने मराठवाड्यातील सर्वच्या सर्व ८ जिल्ह्यांत ओला दुष्काळ जाहीर करून पंचनाम्यांची वाट न पाहता शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रु. मदत देण्याची आवश्यकता आहे. सत्तेवर येण्यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना ५० हजार रु. हेक्टरी भरपाई देण्याची मागणी केली होती. आता ठाकरे यांनी आपण केलेली मागणी पूर्ण करावी आणि संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे खरिपाची कापुस, सोयाबीन, मका, मुग, उडीद ही पिके १०० टक्के वाया गेली आहेत. ऊसाचे पीकही आडवे झाले आहे. या पावसात शेतकऱ्यांची हजाराच्या वर जनावरे वाहून गेली आहेत. राहती घरे जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान एक हजार कोटींपेक्षा अधिक असावे असा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाने पंचनाम्याचे कागदी घोडे नाचवायला सुरुवात केली आहे. आता सरकारने पंचनामे होण्याची वाट न बघता सरसकट हेक्टरी ५० हजार रु. मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी , असेही राजेंद्र मस्के यांनी पत्रकात नमूद केले आहे.
शेतकऱ्यांचे एवढे नुकसान होऊनही अशोकराव चव्हाण, धनंजय मुंडे, राजेश टोपे, अमित देशमुख, अब्दुल सत्तार, संदिपान घुमरे हे मराठवाड्यातील मंत्री मात्र मूग गिळून गप्प आहेत. या मंत्र्यांनी सरकारला मदत जाहीर करण्यास भाग पाडले पाहिजे. अन्यथा या मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या संतापाला तोंड द्यावे लागेल , असा इशाराही पत्रकात दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!