अंबाजोगाई, दि. 12 (लोकाशा न्यूज) : केज विधानसभा मतदारसंघातील उपलब्ध 16 नैसर्गिक साइटवर साठवण तलावांची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदार संघाची ओळख हा महाराष्ट्राला ऊस तोड मजूर पुरवणारा मतदार संघ अशी आहे. यांचे प्रमुख कारण या विभागातील कोरडवाहू शेती हे आहे. या मतदारसंघात साठवण तलावांची निर्मिती व्हावी अशा अनेक नैसर्गिक जागा उपलब्ध आहेत. शिवाय या मतदारसंघातील नागरीकांची ही अनेक वर्षांपासूनची मागणी ही आहे. या साठवण तलावांच्या निर्मितीमुळे प्रतिवर्षी ऊसतोडणीसाठी जाणारा मंजूर शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाल्यामुळे आपल्या शेतात काम करतील व त्यांचे जीवनमान स्थिरावण्यास मदत होईल. त्यासाठी केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील उपलब्ध असलेल्या या नैसर्गिक साइडस् वर मांजरा खो-यातील अनेक उपनद्दांचे कोट्यावधी लिटर पाणी प्रतिवर्षी वाहुन जात असते. तेंव्हा या पाण्याची आडवणुक करुन अंबाजोगाई तालुक्यातील उपलब्ध नैसर्गिक साइडवर बुट्टेनाथ साठवण तलाव, कुरणवाडी साठवण तलाव, धावडी साठवण तलाव, वरवटी साठवण तलाव, साकुड साठवण तलाव, राक्षसवाडी साठवण तलाव, मांडवा तांडा साठवण तलाव, चिचखंडी साठवण तलाव, ममदापूर (परळी) साठवण तलाव, येल्डा साठवण तलाव आणि केज तालुक्यातील कोरड्याचीवाडी साठवण तलाव, घाटेवाडी साठवण तलाव, कचारवाडी साठवण तलाव, बेंगाळवाडी साठवण तलाव,बुरंडवाडी साठवण तलाव, देवगाव साठवण तलाव, कोल्हेवाडी तलाव या साठवण तलावांची निर्मिती करण्यासंदर्भात संबंधित कार्यालयास सर्वेक्षणाचे आदेश देण्यात येवून या सर्व साठवण तलावांचा मंजूरी देण्यात येवून या मतदारसंघातील ऊसतोड मजूरांचे सातत्याने होणारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.