बीड, दि.8 (लोकाशा न्युज) ः जिल्ह्यात मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासन गतिमान झाले असून इतर कामे बाजुला ठेवून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी बुधवारी दि.8 सप्टेंबर रोजी कृषी अधिकार्यांना दिले आहेत. दि.4 ते 7 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टने झालेल्या शेतीपिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात येणार आहेत, शेतकर्यांना तात्काळ मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले असून कोणत्याही परिस्थितीत शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही, सर्वेतोपरी मदत मिळून देण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी शर्मा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी कृषी अधिक्षक बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे श्री. वाघ हे उपस्थिती होते.
जिल्हाधिकारी शर्मा पुढे म्हणाले की, जिल्ह्यात दि.4 ते 7 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व गारपीटीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासन अत्यंत वेगाने कामाला लागले आहे. शेतकर्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा कृषी अधिक्षकांना पंचनाम करण्याचे आदेश दिले आहे. शेतपिकांचे झालेल्या नुकसानीबाबत बाधित शेतकर्यांचे पंचनामे करताना कृषी, महसूल अधिकारी, कर्मचार्यांबरोबरच विमा कंपनीचा प्रतिनिधी देखील असणार आहे. पिक विमा नुकसानग्रस्तांना एसडीआरएफच्या दराने मदत देण्यासाठी अगोदर पंचनामे करण्यात येतील. 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांचा सविस्तर अहवाल कृषी विभाग तयार करेल. त्यानंतर हा अहवाल शासनास पाठविण्यात येईल. प्रशासन म्हणून शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित विभाग पूर्ण क्षमतेने काम करत आहेत, शेतकर्यांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे याप्रसंगी ते म्हणाले.
रेशनकार्ड गायब प्रकरणी लवकरच कारवाई
दरम्यान, पत्रकार परिषदेत पत्रकाराने जिल्हाधिकार्यांना पाच हजार रेशनकार्डबाबत प्रश्न विचारल्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, या प्रकरणात जिल्हा पुरवठा विभागाकडून कार्यवाही सुरू आहे, पूर्व अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास आला असला तरी त्यामध्ये आणखी सविस्तर बाबी नोंद करण्यास सुचित केले आहे. लवकरच याची सर्व चौकशी पूर्ण करूनच कारवाई केली जाईल. दोषींची गय केली जाणार नाही.