नाशिक दि .24 – भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुंबई आणि कोकण पट्टा पिंजून काढणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते . युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला . त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत . राणेंचा मुक्काम सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये असून त्यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाले आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्यची शक्यता आहे . कारण , नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे . शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती . नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता . त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे . नारायण राणे सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये थांबले आहेत . नाशिक पोलिसांचे पथक येथूनच नारायण राणे यांना ताब्यात घेतील , अशी शक्यता वर्तवली जात आहे . त्यामुळे आता राणे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे .
दरम्यान , नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे . रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं . स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले . त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला . मात्र , तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं . त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली . “ आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी … नाही हीरक महोत्सवी … अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत ” , असं उद्धव ठाकरे म्हणाले होते . त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती , असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता .