मुंबई, दि.१७ : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या संबंधांमुळे पाकिस्तानची क्रिकेट टीमला (Pakistan cricket team) भारतामध्ये येण्यासाठी केंद्र सरकार व्हिसा देणार का? हा प्रश्न आयसीसीला (ICC) पडला होता. शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानी खेळाडू आणि मीडियाला व्हिसा देण्यासाठी भारत सरकार तयार झाल्याची माहिती बीसीसीआयनं (BCCI) आयसीसीला दिली आहे. त्यामुळे आता आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) भारतामध्ये येण्याचा पाकिस्तानचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र पाकिस्तानच्या फॅन्सना भारतामध्ये मॅच पाहण्यासाठी येण्यास परवानगी देण्याबाबत सरकारनं अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.
या बैठकीत सहभागी झालेल्या एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं न्यूज एजन्सीला या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. ‘टी 20 वर्ल्ड कप ही एक जागतिक स्पर्धा आहे. त्यामुळे पाकिस्तानचे खेळाडू आणि मीडियाला भारतामध्ये येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या विषयावर आगामी काळात आणखी चर्चा होणार आहे.’ यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी यांनी बीसीसीआयला या विषयावरील भूमिका स्पष्ट करण्यासाठी 31 मार्चपर्यंत अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर 1 एप्रिल रोजी बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यात झालेल्या बैठकीत या विषयावर एक महिन्याच्या आत तोडगा काढण्याचं आश्वासन बीसीसीआयनं दिलं होतं. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेच्या आयोजनाबाबतही या बैठकीत चर्चा झाली. एकूण 9 स्टेडियमला या स्पर्धेसाठी तयारी करण्याची सूचना बोर्डानं केली आहे. सध्या तरी स्पर्धेची फायनल अहमदाबादमध्ये होणार असं ठरलं आहे. त्याचबरोबर मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरु, लखनऊ आणि धरमशाला ही ठिकाणं शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत.