महाराष्ट्र

‘झपाटलेला’मधील ‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन

झपाटलेला या प्रसिद्ध सिनेमात बाबा चमत्कार ही अजरामर भूमिका साकारून नावारूपास आलेले ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांनी पुण्यात वयाच्या 83 व्या वर्षी गुरुवारी( दि.४) सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. कडकोळ हे मराठी अभिनेते आणि लेखक आहेत. त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, तसेच दूरचित्रवाहिनी मालिकांतून अभिनय केला आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
बालगंधर्व परिवारतर्फे ज्येष्ठ नाटय़-चित्रपट अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते.
राघवेंद्र कडकोळ यांनी कृष्णधवल चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. रंगभूमीवर त्यांनी काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर यासारख्या दिग्गज कलावंतांसोबत काम केले. कडकोळ यांची ‘झपाटलेला’ या चित्रपटातील ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका विशेष गाजली. त्यांनी ‘अश्रूंची झाली फुले’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ यांसारख्या अनेक नाटकांमध्ये चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील ‘धर्माप्पा’ ही भूमिकाही गाजली. कडकोळ यांनी ‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘कुठे शोधू मी तिला’, ‘गौैरी’, ‘सखी’ या मराठी चित्रपटांमध्ये, तर ‘छोडो कल की बाते’ या हिंदी चित्रपटात काम केले आहे. कडकोळ यांनी ‘गोल्ड मेडल’ नावाचे पुस्तकही लिहीले आहे. चित्रपट, नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
महाविद्यालयात शिकत असताना कडकोळ यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरातील आर्थिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. उदरनिर्वाहासाठी त्यांनी जंगल खात्यात टायपिस्ट म्हणून सरकारी नोकरी मिळवली. सुरुवातीच्या काळात कडकोळ यांनी नोकरी करत असताना त्यांनी रंगभूमीच्या पडद्यामागे कलाकारांना निरोप देणे, चहा देणे, खुर्च्या मांडणे अशी मिळेल ती कामे स्वीकारली. परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी कधीच कोणासमोर काम मिळवण्याची मागणी केली नाही. “करायला गेलो एक” हे पहिले व्यावसायिक नाटक त्यांनी साकारले. महिन्यातून 20-22 दिवस नाटकांचे दौरे असल्याने नोकरीवर परिणाम होऊ लागला. त्यामुळे हातच्या नोकरीवर त्यांना पाणी सोडावे लागले होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!