बीड क्राईम

खेळण्यासाठी गेलेल्या बालकांचा शाळेच्या परिसरात आढळला मृतदेह; नेकनूर परिसरात खळबळ : नातेवाईकांकडून खून केल्याचा आरोप

नेकनूर – शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नेकनूर जवळील रत्नागिरी ( ता.बीड ) येथे घडली . शाळेच्या आवारातच त्याचा मृतदेह आढळुन आल्याने खळबळ उडाली असुन त्याच्या गळ्यावर असलेले खुणा पाहता हा खूनाचा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे . मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनीही घातपाताचा आरोप केला असुन पोलिस पुढील तपास करत आहेत . दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आला आहे .

नेकनुरपासुन जवळच असलेल्या रत्नागिरी येथील धनराज मोतीराम सपकाळ ( वय ६ ) हा आज सकाळी नेहमीप्रमाणे बहिणीसोबत गावातीलच शाळेत खेळण्यासाठी गेला होता . ११.३० वाजण्याच्या सुमारास सर्व विद्यार्थी शाळेच्या परिसरात खेळत होते . अचानक धनराज सपकाळ दिसेनासा झाला . यावेळी त्याचा शोध घेतला असता शाळेच्या आवारातच तो मृत अवस्थेत आढळुन आला . त्याला तात्काळ नेकनुरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले . यावेळी डॉ.घुले यांनी तपासुन त्याला मयत घोषीत केले . धनराजचा मृत्यू गळा दाबुन झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे .

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार धनराजच्या गळ्याभोवती हाताने आवळल्याच्या खूणा आहेत . यावरून त्याचा खून झाल्याचा आरोप कुटुंब आणि नातेवाईकांनी केला आहे . घटनास्थळी पोलिस दाखल झाले असुन शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले . दरम्यान या घटनेने नेकनुर आणि परिसरात खळबळ उडाली आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!