बीड

श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकासासाठी अधिकचा निधी द्या, अधिकचा निधी देण्याची पालकमंत्री धनंजय मुंडेंची ग्वाही, डिपीडीसीच्या बैठकीत आ.संदिप भैय्यांनी मांडले बीड मतदार संघातील अनेक प्रश्न


बीड, दि. 2 (लोकाशा न्यूज) : धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकासासाठी अधिकचा निधी देण्यात यावा, केवळ आराखडा न राहता श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकास आराखड्यातील सर्व कामे जलदगतीने करण्यात यावीत यासाठी मंत्रालयस्तरावर बैठक बोलवण्यात यावी. आयटीआयची इमारत धोकादायक झाली असल्याने याबाबत मंत्रालयीनस्तरावर बैठक बोलवून आयटीआयची इमारत उभारणीसाठी अधिकचा निधी द्यावा. शहरातील अल्पसंख्यांक विद्यार्थीनींच्या वसतीगृहासाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेला निर्देश द्यावेत. जि.प.च्या प्राथमिक शाळांची दुरावस्था झाली असल्याने नवीन शाळा व दुरूस्तीसाठी असलेले नियतव्य वाढवण्यात यावे, बीड मतदार संघाच्या विकासासाठी अधिकचा निधी देण्यात यावा अशी मागणी आ.संदिप क्षीरसागर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली आहे. श्री क्षेत्र नारायणगडासह बीडमधील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, मंत्रालयस्तरावर प्रश्नांचा पाठपुरावा करून संबंधित मंत्र्यांकडे बैठका बोलवून बीडमधील प्रश्न निकाली काढू अशी ग्वाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. मंगळवार दि.2 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी जगताप, आ.प्रकाश सोळंके, आ.बाळासाहेब आजबे, आ.लक्ष्मण पवार, आ.विनायक मेटे, आ.संजय दौंड, आ.नमिता मुंदडा, जि.प.अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, जि.प.उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, जि.प.सदस्य विजयसिंह पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक लांजेवर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बीड मतदार संघातील आ.संदिप क्षीरसागर यांनी अनेक मुद्दे मांडले. बीड विधानसभा क्षेत्रात अनेक ठिकाणी अंगणवाड्यांना इमारत नाही. असे असतांना जाणीवपूर्वक अंगणवाडी बांधकाम करण्यास विलंब करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, जिल्हा क्रीडा कार्यालयात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. याठिकाणी खेळाडुंच्या अनेक तक्रारी असून त्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हास्तरावरून चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, बीड शहरात सन 2012 पासूनची अनेक विकास कामे रखडलेली आहे. भुयारी गटार, अमृत पाणी पुरवठा या योजना करत असतांना अनेक ठिकाणचे रस्ते खोदुन ठेवले आहेत. याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. दोन्ही योजनांचे काम मुदतीत पुर्ण होणे गरजेचे असतांना मुदत संपली तरी अर्धेही काम झालेले नाही. त्यामुळे यावर कार्यवाही करण्यात यावी. यापुढे देण्यात येणारा पालिकेला निधी थेट नगर पालिकेला न देता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देवून शहरातील विकास कामे गुणवत्तापुर्ण करून घेण्यासाठी प्रशासनाने अधिकचे लक्ष द्यावे, श्री क्षेत्र नारायणगड विकास आराखड्यातील विकास कामांना होणार विलंब मंत्रालयस्तरावर निधी वितरणासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेता संबंधित मंत्री, सचिव यांच्यासोबत बैठकांचे आयोजन करून बीड मतदार संघासाठी अधिकचा निधी द्यावे अशी मागणी या बैठकीत आ.संदिप क्षीरसागर यांनी केली. यावर पालकमंत्री धनंजय मुंंडे यांनी बीड मतदार संघासाठी अधिकचा निधी देवू, श्री क्षेत्र नारायणगड आणि आयटीआयच्या इमारत बांधकामा संदर्भात मंत्रालयीन स्तरावर बैठक लावून अधिकचा निधी देवून दोन्ही प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

चौकट
मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टेंना डिपीडीसीच्या बैठकीतून हाकलले
निलंबनाची कारवाई प्रस्तावित; माहिती न देणे अंगलट

जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी प्रसंगी मुख्याधिकार्‍यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे. माहिती सादर न करणार्‍या बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सदस्यांनी चांगलाच दणका दिली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपुर्वी सर्व विभागांकडून विविध विषयांची माहिती मागविण्यात येते. याप्रसंगी मुख्याधिकारी गुट्टे यांनी नगर पालिकेतील विविध विकास कामे, अनुपालन अहवाल व योजनांची माहिती दिली नाही. त्यामुळे सर्व सदस्यांनी गुट्टे यांना सभागृहाबाहेर हाकलले. त्यांच्याविरूद्ध निलंबनाच्या कारवाईचा ठराव घेवून कार्यवाही प्रस्तावित करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. या कार्यवाहीने प्रशासनातील कामचुकार अधिकारी कर्मचार्‍यावर वचक निर्माण झाला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!