मुंबई,दि.२८ (लोकाशा न्यूज) : भांडवली बाजारात महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होण्याच्या दिवशीच शेअर बाजाराने जोरदार आपटी खाल्ल्याचे चित्र दिसत आहे. डिसेंबरनंतर पहिल्यांदाच शेअर बाजारातील व्यवहार ४७ हजारांखाली सुरु झालाय. बुधवारी बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये घसरण झाल्यानंतर आज बाजारातील व्यवहार सुरु झाल्यानंतरही तोच ट्रेण्ड दिसून आला. सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी गडगडला. बुधवारी ४७,५०० ला बंद झालेला सेन्सेक्स आज बाजार सुरु झाला तेव्हा ४७ हजारांहून अधिक खाली होता. निफ्टीही १३ हजार ८०० पर्यंत गडगडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
प्री ओपनिंग सेशन्समध्येच सेन्सेक्स ७०० अंशांहून अधिक पडल्याचे चित्र दिसत होतं तर निफ्टीही २०० हून अधिक अंकांनी पडला. गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने बाजाराने मोठी आपटी खाल्ल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. अमेरिकन बाजारपेठेमध्ये सोन्याचे भावही गडगडले असून त्याचा परिणामही शेअर बाजारातील गुंतवणुकीवर झाल्याचे कोटक महिंद्रा सिक्युरिटीजचे रविंद्र राव यांनी म्हटलं आहे. बाजारातील अस्थितरता कायम राहण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे.