बीड

राम मंदिर निधी संकलनासाठी आज खा.प्रितमताईंच्या उपस्थितीत भाजपाची जिल्हा बैठक


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील श्रीप्रभू रामचंद्र मंदिराच्या उभारणीचे काम सुरु झाले. जगातील तमाम हिंदू बांधवांची हे राम मंदिर अयोध्येमध्ये उभारले जावे हि श्रद्धा आणि भावना होती. आज प्रत्यक्षात भव्य मंदिर कामास सुरुवात झाली आहे. राम मंदिर संघर्षात सर्वांचा सहभाग होता. तसाच मंदिर निर्माण कार्यातही देशातील प्रत्येक हिंदू बांधव व राम भक्तांचे योगदान असावे यासाठी देशभरात निधी संकलन अभियान सुरु झाले आहे. या मंदीर निर्माण कार्यात बीड जिल्ह्याचेही योगदान देण्यासाठी जिल्हाभरात निधी संकलन अभियान सुरु होत आहे. या अनुषंगाने आज जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार तथा प्रदेश उपाध्यक्षा डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड येथे हॉटेल यशराज इन येथे सकाळी 11:30 वा जिल्हास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे.अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.

    तमाम राम भक्तांचे श्रद्धास्थान असणार्‍या अयोध्येतील राम मंदिराला 492 वर्षाचा इतिहास लाभला आहे. सन 1528 मध्ये मुगल बादशहा बाबराचा सरदार मिर बाकीने हे मंदिर पाडून मस्जिद उभारली. तेव्हापासून राम भक्तांना हा आघात सहन करावा लागत होता. अनेक वर्षापासून मंदिर उभारणीची चळवळ देशामध्ये चालू होती. पूर्वजांचे शौर्य आणि धैर्य भावी पिढीकडे असल्यामुळे या सातत्यपूर्ण चळवळीत राम भक्तांनी सर्व स्तरावरून लढा दिला. अखेर 9 नोव्हेंबर 2019 ला सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल देऊन या हिंदू बांधवांना न्याय दिला. अखेर 5 ऑगस्ट 2020 रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदिजी यांच्या शुभहस्ते या भव्य मंदिराची आधारशीला ठेवण्यात आली. आज मात्र प्रत्यक्षात राम मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे. पूर्ण मंदिर बांधण्यासाठी अनेक दानशूर पुढे येत आहेत. विविधतेने नटलेल्या या देशात श्रीप्रभू रामचंद्राच्या आदर्श व्यक्तिमत्व व चरित्रावर करोडो लोकांची श्रद्धा आहे. देशातील प्रत्येक राम भक्तांची मदत मंदिर निर्माण कार्यात समर्पित व्हावी या उदात्त हेतूने राम मंदिर निधी संकलन अभियान सुरु केलेले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी हि बैठक होत आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!