महाराष्ट्र मराठवाडा

त्या 800 कोबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच; अहवालात स्पष्टीकरण

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये दोन दिवसांत ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर परभणी येथील पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. मयत पक्ष्यांचे नमुने पुणे येथील अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या तपासणीच्या अहवालात या कोबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
मृत पावलेल्या त्या ८०० कोंबड्याचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे मुरुंबा गाव संसर्गित झाल्याचे जाहीर करून बर्ड फ्लूच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची कारवाई मंगळवारपासून करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे.
स्थानिक पातळीवर बर्ड फ्लू हा रोग नियंत्रात आणणं शक्य आहे. पशुसंवर्धन विभाग उपाययोजना करत आहे. उर्वरीत महराष्ट्रात चिकन आणि अंडी खरेदी विक्रीवर आणि खाण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच अशी आवश्यकताही नाही, असं पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील विजयकुमार सखाराम झाडे यांच्या कुक्कुटगृहात ७ जानेवारी रोजी ३३६, तर ८ जानेवारी रोजी ४६४ कोंबड्या अचानक मरण पावल्या. २४ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांनी ३४ दिवस वय असलेले हे ८०० पक्षी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथून खरेदी केले होते. या पक्ष्यांना लासोटा, मानमोडी, आयबीडी, मरेक्स या रोगाची लस देण्यात आली होती. कावेरी या जातीच्या असलेल्या कोंबड्या अंदाजे १.५ ते २ किलो ग्रॅम वजनाच्या असून त्यांचे वय ३.५ महिने होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या अनुषंगाने एक आदेश काढला आहे. मुरुंबा येथे सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत या गावातील कुक्कुट पक्ष्यांची खरेदी- विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शन अवागमनास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. मुरुंबा गाव शिवारातील ५ किमी परिसरात हा आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच मुरुंबा हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत मुरुंबा गावातील अवागमन प्रतिबंधित करण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!