बीड

गंगाखेड परळी रस्त्यावरील भीषण अपघातात अंबाजोगाईतील चार ठार


गंगाखेड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : गंगाखेडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर परळी रोडवर असलेल्या करम पाटी जवळील जिनिंग समोर झालेल्या हायवा व ऑटोच्या अपघातात ऑटोतील चौघे ठार झाल्याची घटना दि. 13 डिसेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेले चारही तरुण हे अंबाजोगाई येथील आहेत. हायवा खाली फसल्याने चुराडा झालेल्या ऑटोतील मृतदेह रात्री साडे आठ वाजता बाहेर काढण्यात आले.
सोनपेठ तालुक्यातील चुकार पिंपरी येथील विवाह सोहळा आटोपून गंगाखेड परळी रस्त्याने परत परळी मार्गे अंबाजोगाईकडे निघालेल्या रियर ऑटो (क्रमांक एम.एच. 23 टी.आर. 311) ला परळीकडून राख घेऊन गंगाखेडकडे येत असलेल्या हायवा (क्रमांक एम.एच. 22 ए. एन. 5121) ने समोरासमोर जोराची धडक दिली. या अपघातात ऑटोचा चुराडा होऊन ऑटोतील विशाल बागवाले (20), दत्ता भागवत सोळंके (25), आकाश चौधरी (23), ऑटो चालक मुकुंद मस्के (22) (सर्व रा. अंबाजोगाई) हे चार तरुण जागीच ठार झाले आहेत. अपघाताची माहिती समजताच सोनपेठ पोलीस ठाण्याचे स.पो.नि. श्रीनिवास भिकाने, स.पो.उपनिरिक्षक देवराव मुंढे, पांडुरंग काळे, गणेश नाटकर, गोपाळ खंदारे, गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, स.पो.नि. राजेश राठोड, स.पो. उपनिरिक्षक टी. टी. शिंदे, पोलीस शिपाई चंद्रशेखर कावळे, सुग्रीव सावंत, कृष्णा तंबूड, होमगार्ड एस. जी. क्षिरसागर, रात्र गस्तीवर असलेले स.पो.उपनिरिक्षक दिलीप अवचार, निवृत्ती मुंढे, पोलीस शिपाई जयराम दुधाटे, केशव मुंढे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. हायवाखाली सापडून चुराडा झालेला ऑटो व त्यात अडकलेल्या मयतांचे मृतदेह करम, निळा, वडगाव स्टेशन येथील ग्रामस्थ व अन्य लोकांच्या मदतीने रात्री 8:30 वाजता बाहेर काढून गंगाखेड येथील खाजगी रुग्णवाहिकेतून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलविले. हायवा चालक फरार झाल्याने हायवा खाली सापडलेला ऑटो व त्यातील मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीसांना व ग्रामस्थांना अथक परिश्रम करावे लागले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!