बीड

घरकुलात बोगसगिरी करणारे उघडे पडणार!अनुदान घेवून बांधकाम केले नसल्यास गुन्हा तर दाखल होणारच, मात्र घेतलेले अनुदानही वसूल केले जाणार, जिल्हाधिकार्‍यांचे संकेत
बीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घरकुलाचे अनुदान घेवून देखील बांधकाम पूर्ण केले नसल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे, असे स्पष्ट संकेत जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी मंगळवारी जिल्ह्यातील आवास योजनांचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना रेखावार म्हणाले, की जिल्ह्यातील आवास योजनेच्या आभार अनुदान घेवून देखील घरकुलाचे बांधकाम केलेले नसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून सदर अनुदान वसुलीची कारवाई केली जाईल. आवास योजनांमध्ये घरकुल मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांना त्याचे बांधकाम करण्यासाठी शासकीय अनुदान वितरीत करण्यात आले आहेत. या घरकुलांचे बांधकाम  12 महिण्याच्या आतमध्ये पुर्ण होणे अभिप्रेत असून तसे न करता अनेक लाभार्थी फक्त अनुदान घेत असल्याने जिल्ह्यातील योजनेचे उदिष्ट साध्य होत नाही, अशा लाभार्थ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी नमूद केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान घरकुलात बोगसगिरी करणारे जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयामुळे उघडे पडणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!