बीड, दि.28 (लोकाशा न्युज) ः बीड जिल्ह्यात बिबट्याने हाहाकार माजवला असून आतापर्यंत दोन जणाचा बळी घेतल्यानंतर शनिवारी आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथे संध्याकाळी 6 च्या दरम्यान, मायलेकीवर हल्ला केला आहे. तर शिरूर तालुक्यातील कोळवाडी व आष्टी तालुक्यातील शेरी येथेही बिबट्याचे दर्शन झाले आहे.
आष्टी शहरापासून जवळ असलेल्या मंगरूळ गावाच्या शिवारात सायं 5:30 च्या सुमारास शेतात काम करणार्यांना माय लेकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यातून दोघेही सुखरूप वाचली असुन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आष्टी तालुक्यात बिबट्याने माणसांना लक्ष केले असुन गेल्या चार दिवसांमध्ये दोघांचा जीव घेतला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. किन्ही येथे प्रशासन ठाण मांडून असतांना आज आष्टीच्या जवळ असलेल्या मंगरूळ शिवाय बिबट्याने माय – लेकावर हल्ला केला आहे. शिलावती दत्ताञय दिंडे व मुलगा अभिषेक दिंडे हे मायलेक गावातील शेतात तुरीच्या शेंगा तोडत असताना बिबट्याने महिलेवर हल्ला केला. माञ अभिषेकने प्रसंंगावधान राखून आरडाओरडा केल्याने बिबट्याने घटनास्थळावरुन धूम ठोकली. महिलेच्या हाताला व इतरञ बिबट्याने चावा घेण्याचा प्रयत्न केला. माञ सुदैवाने गंभीर इजा झाली नाही. दरम्यान, पारगाव सिरस येथे देखील एका शेळीचा फाडशा पाडलेला आहे. मात्र, तो बिबट्याने पाडला की आन्य कोणत्या वन्यप्राण्यांनी हे बातमी देईपर्यंत समजू शकले नव्हते. तर शेरी व कोळवाडी येथेही बिबट्याने दर्शन दिले. मात्र येथे कोणतेही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, बिबट्याचे या हाहाकाराने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.