अमेरिका, दि. ९ (लोकाशा न्यूज) : राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्याकडून झालेला पराभव अद्यापी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारलेला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पराभव मान्य करावा, असे त्यांच्या निकटवर्तीय वर्तुळातील काही लोकांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांना सुद्धा, डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पराभव मान्य करावा, असे वाटते. त्यांनी आपल्या पतीला तसा सल्ला दिला आहे. अमेरिकन माध्यमांनी हे वृत्त दिलेय.
मेलेनिया ट्रम्प यांनी जाहीरपणे निवडणुकीवर भाष्य केलेले नाही. पण खासगीमध्ये मात्र त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे असे वृत्त सीएनएनने दिले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची फेरनिवड व्हावी, यासाठी मेलेनिया ट्रम्प यांनी मागच्या महिन्यात प्रचारही केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि सल्लागार जेराड कुशनर यांनी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव मान्य करण्याचा सल्ला दिला आहे. सूत्रांच्या हवाल्याने सीएनएनने हे वृत्त दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणी सुरु असतानाच बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला. त्या विरोधात ते कोर्टातही गेले. मंगळवारी अमेरिकेत मतदान झाले. त्यानंतर तब्बल चार दिवस मतमोजणीची प्रक्रिया सुरु होती. अखेर शनिवारी रात्री निकाल जाहीर झाला. पेनसिल्व्हेनिया राज्याने बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केलं. या राज्यामुळे बायडेन यांना २७० पेक्षा अधिक इलेक्टोरल व्होटस मिळवता आले. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्याही उमेदवाराला २७० व्होटस मिळवणे आवश्यक असते.