परळी, दि. ४ (लोकाशा न्युज) :- परळी शहरापासून चांदापूर या ठिकाणच्या तलावात सकाळी पोहण्यासाठी गेलेला तरूण तलावात बुडाला असल्याचा संशय व्यक्त होत असून सदर तरूण पोलिस आणि नागरिकांनी दहा तास प्रयत्न करूनही अद्याप सापडला नसल्याने नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. परळी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदापूर येथील तुडुंब भरलेल्या तलावात सकाळी ११ वाजता येथील हबीबपुरा भागातील शेख खाजामिया नावाचा तरुण पोहण्यासाठी म्हणून गेला मात्र सदर तरुण बुडाला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. खाजामिया पोहण्यासाठी तलावात गेला मात्र तो परत वरी आलाच नाही. सदरची वार्ता सकाळी वार्यासारखी पसरली आणि परळी शहरासह चांदापूर तलाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने तलावावर जमा झाले. त्याचबरोबर सदरची वार्ता परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनाही समजली. माहिती मिळताच त्यांनी पोलिस उपनिरीक्षक जिरगे यांच्यासह पाच ते सहा पोलीस कर्मचारी घटनास्थळी पाठवले. जमा झालेले नागरिक आणि पोलीस कर्मचारी सकाळी अकरा वाजल्यापासून तलावात सदर तरुणाचा शोध घेत असून दहा तास उलटून गेले तरीही त्याचा तपास लागलेला नाही. तपास कार्य अद्याप सुरूच असून खाजामिया न सापडल्याने त्याच्या परिवारामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तपास अद्याप सुरूच आहे.
“महसूल प्रशासन झोपेत”
परळी शहरापासून जवळच चांदापूर येथील तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला असल्याचा संशय असून दहा तास उलटून गेले तरीही अद्याप सापडलेला नाही. पोलीस कर्मचारी आणि नागरिक त्याचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. शहरांमध्ये तहसील आणि उपजिल्हाधिकारी यांचे कार्यालय आहे. हे कार्यालय केवळ नावापुरतेच आहे की काय अशी चर्चा शहरांमध्ये सुरू आहे. तरुण तलावात बुडाल्याची खळबळजनक घटना घडूनही अद्याप दोन्ही कार्यालयाचा एकही अधिकारी कर्मचारी घटनास्थळी गेलेला नाही. याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. महसूल प्रशासनाने घटनास्थळी शोध पथक बोलावण्याची गरज होती मात्र अद्याप कोणतीच हालचाल झालेली दिसून येत नाही.