बीड

तलावात पाण्यात बुडालेला तरूण तब्बल २८ तासाने सापडला ; पुणे येथील शोध पथकास आले यश

परळी, दि. ५ (लोकाशा न्युज) :– काल सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला परळीचा हबीबपूरा भागातील तरुण शेख खाजा हा तब्बल २८ तासांनी शोध कार्य करणाऱ्या पथकास सापडला. सदर तरुणाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल दिनांक ४ ऑक्टोंबर २०२० सकाळी ११ वाजता परळी शहरातील हबीबपुरा भागातील शेख खाजामिया नावाचा तरुण आपल्या मित्रांसोबत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेला होता. सदर तरुणास पोहता येत नव्हते. सुरुवातीस चार ते पाच दिवस पोटास ट्युब बांधून तालुक्यातील नागापूर याठिकाणच्या वाण धरणात पोहणे शिकण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याने पोहण्यासाठी आपला मोर्चा चांदापूर येथील तलावाकडे वळवला. काल सकाळी जवळपास अकरा वाजण्याच्या सुमारास तो आपल्या मित्रांसोबत चांदापूर तलावाकडे गेला आणि आता आपणास पोहणे येते असे समजून पोटास कांही न बांधताच पाण्यात उडी मारली. खाजामियाने पोहण्यासाठी पाण्यात उडी मारताच तो परत वरती आलाच नाही. खाजामिया पाण्यातच बुडाला. सदरची वार्ता वाऱ्यासारखी परळी शहरात आणि‌ तलाव परिसरात पोहोचली. माहिती जसजशी कळाली तस तसे नागरिक बुडालेल्या खाजामियास बाहेर काढण्यासाठी तलावाकडे धावले आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी शोध कार्य करण्यास सुरुवात केली. काल अंधार पडेपर्यंत खाजामियाचा शोध घेतला गेला मात्र तो सापडला नाही. तेव्हा खाजामियास शोधण्यासाठी पुणे येथील जलद कृती दलाला पाचारण करण्यात आले आणि सदर पथकाने तलावात शोध सुरू केला शेवटी त्यांना यश आले. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास म्हणजे तब्बल २८ तासानंतर चांदापुर तलावात पोहण्यासाठी गेलेला खाजामिया मृतावस्थेत आढळून आला. मयत खाजामियाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे पुढील तपास पोलिस करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!