बीड

‘ते’ हस्ताक्षर विवेकचे नाही !! चिठ्ठीतील बनावटपणा उघड, अज्ञातावर गुन्हा दाखल

विद्यार्थ्याच्या आत्महत्येने उडाली होती खळबळ



बीड : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे नीट परीक्षेत माझा नंबर लागत नाही, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहून बीड तालुक्यातील केतुरा येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्ये केल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. मात्र, त्या मजकुरातील हस्ताक्षर विवेकचे नसल्याचा अहवाल औरंगाबाद येथील हस्ताक्षर तज्ञांनी दिल्याने त्या चिठ्ठीचा बनावटपणा उघड झाला आहे. याप्रकरणी सामाजिक शांतता भंग करणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला.
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या विवेक कल्याण रहाडे (या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही घटना बुधवारी (दि.३०) दुपारी दीड वाजता तालुक्यातील केतुरा येथे घडली. बीड ग्रामीण पोलिसांनी ताबडतो घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि शवविच्छेदनानंतर विवेकच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. मात्र, सायंकाळी अंत्यविधीहून परतल्यानंतर नातेवाईकांनी विवेकने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा केला. त्या आशयाची चिट्ठी देखील विवेकने लिहून ठेवल्याचे सांगितले जात होते. ‘आरक्षण स्थगित केल्यामुळे माझा नीट परीक्षेत नंबर लागत नाही, माझ्या मृत्युनंतर तरी सरकारला मराठ्याच्या मुलांची कीव येईल’ असा मजकूर त्या कथित चिठ्ठीत होता. पोलिसांनी दुपारी केलेल्या पंचनाम्यात चिठ्ठीचा उल्लेख नव्हता. त्यानंतर रजिस्टरच्या पाठीमागील एका पानावर लिहून ठेवलेली चिट्ठी सापडल्याचा दावा नातेवाईकांनी केला. थोड्याच वेळात सदरील चिठ्ठी सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाली. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे मराठा समाजात आधीच नैराश्याचे वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर या चिठ्ठीमुळे क्षोभ निर्माण होऊ लागला. अनेक राजकीय व्यक्तींनी देखील आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याच्या वृत्तामुळे चिंता व्यक्त केली.

हस्ताक्षर तज्ञांनी केली पोलखोल
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी हे प्रकरण अतिशय काळजीपूर्वक हाताळले. पोलिसांनी तो मजकूर लिहिलेले रजिस्टर जप्त केले आणि त्यातील मजुकर विवेकनेच लिहिला आहे का याची खात्री करण्यासाठी विवेकच्या हस्ताक्षराचे इतर काही नमुने घेतले. हे सर्व नमुने औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त मुख्य शासकीय परीक्षक यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. सदरील हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल शुक्रवारी (दि.०२) बीड पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात तो वादग्रस्त मजकूरातील हस्ताक्षर विवेकचे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अज्ञातावर गुन्हा
हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल मिळाल्यानंतर बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सुरेश माळी यांच्या फिर्यादीवरून बनावट मजकूर तयार करून केंद्र व राज्यसरकार विरोधात रोष निर्माण करणे, सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने खोटा मजकूर सोशल मिडीयावर व्हायरल करणे यासाठी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!